माकप, मनसे, भाजपाचा विरोध; पालकमंत्री, ग्रामविकास मंत्र्यांकडे तक्रार करणारनाशिक : जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पातील निधी कपातीतील शिल्लक निधीचे नियोजन करण्याचे अधिकार अध्यक्ष जयश्री पवार यांना देण्यावरून विरोधी पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माकप व भाजपाने विरोध दर्शविला असून, सभेनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना घेराव घातला.सुखदेव बनकर यांनी त्यासंदर्भात तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त करीत संबंधित सदस्यांना सभा सुरू असतानाच विरोध का दर्शविला नाही, असे सांगत सदस्यांना तुमचा विरोध असेल तर लेखी तक्रार नोंदवा, अशी सूचना करीत सभागृह सोडले. यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना यासंदर्भात लेखी तक्रार अर्ज दिला आहे. त्यात म्हटले आहे की, २१ मेच्या सर्वसाधारण सभेत आयत्या वेळी अध्यक्षांना निधी नियोजनाचे अधिकार देण्याचा ठराव झाला, तोच मुळी सभागृहातील सदस्यांचे मत न ऐकता झाला आहे. यामागील काळात असे अधिकार देण्याचा ठराव झाला होता. त्यावेळी निधी वाटपात मनमानी करण्यात आली होती. असमतोल निधीचे वाटप करून कुठलाही निकष अथवा निकड असलेल्या गटांना निधी न देता अर्थपूर्ण घडामोडीतून सर्व लेखाशीर्षातील निधीचे वितरण करण्यात आले. चालू वर्षीही हीच प्रथा पुढे चालू राहण्याची शक्यता असल्याने विषयांकीत ठराव रद्द करण्यात यावा, अशी मागणी या पत्रात केली आहे. या पत्रावर माकप गटनेते प्रशांत देवरे, मनसेचे गटनेते संदीप पाटील यांच्यासह भाजपा सदस्य कलावती हरिश्चंद्र चव्हाण, तसेच सेनेच्या भावना भंडारे, सोनाली पवार, माकपचे सदस्य भिका राठोड, सुभाष चौधरी, पंचायत समिती सभापती मंदाकिनी भोये आदिंच्या स्वाक्षर्या आहेत. कॉँग्रेसचे सदस्य प्रा. अनिल पाटील, डॉ. प्रशांत सोनवणे, सभापती अनिल पाटील यांनीही त्यास विरोध दर्शविला आहे.(प्रतिनिधी)
अध्यक्षांना अधिकार देण्यावरून वादंग
By admin | Updated: May 21, 2014 23:00 IST