सिन्नर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदी व लॉकडाउन सुरू आहे याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाडच्या प्रातांधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकासाधिकारी लता गायकवाड, गटशिक्षणाधिकारी मंजूषा साळुंके यांनी पोलीस दलाच्या मदतीने जिल्ह्याच्या सीमेवर चेकपोस्टउभारले आहे. तसेच वावी व आगासखिंड येथे क्वॉरण्टाइन सेंटर उभारले आहे.या कामी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकदेखील राष्ट्रीय कामकाज ड्यूटी करत आहेत. सिन्नर तालुक्यातील जवळपास ३०० शिक्षक काम करत आहेत. वावी, पांढुर्ली व नांदूरशिंगोटे चेकपोस्टवर सकाळी ८ ते सायं.४, दुपारी ४ ते १२ व रात्री १२ ते ८ याप्रमाणे राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहेत. क्वॉरण्टाइन सेंटरवर १२ तासांची ड्यूटी बजावत आहे. यामध्ये चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करणे, नंबर नोंदणी करणे, चालकाचे नाव, मोबाइल नंबर, वाहन कुठून आले, कुठे जाणार आदी नोंदीबरोबरच कोरोना प्रतिबंधक जनजागृती सूचनादेखील दिल्या जातात.कोरोना विषाणूचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन करताना आम्ही सर्व शिक्षक राष्ट्रीय कार्याला हातभार लावत असून, खारीचा वाटा उचलत आहोत. या संकटातून लवकर बाहेर पडू, असा विश्वास संजय भोर यांनी व्यक्त केला.
पोलिसांच्या भूमिकेसोबत राष्ट्रीय कार्यास हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 23:35 IST