नाशिक : राज्यातील कृषी विद्यापीठांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासनाने २४ जुलै २०१५ च्या शासननिर्णयाप्रमाणे सेवेत कायमस्वरूपी सामावून घेतले आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विज्ञान विद्यापीठातील रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांनादेखील नोकरीत कायम सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी सीटूप्रणित विद्यापीठ कामगार संघटनेने वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, मंत्र्यांनी नाशिक दौऱ्यामध्ये मुक्त विद्यापीठातील रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडविल्यामुळे आरोग्य विद्यापीठातील रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांच्याही अपेक्षा उंचावल्या आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यासाठी नाशिकमध्ये आलेले तावडे यांना सीटूच्या वतीने निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात सुमारे ३५० कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सविस्तर लेखी देण्यात आले. कर्मचाऱ्यांना किमान वेतन व भत्ते, सेवेतील इतर सुविधा, समान काम - समान वेतन हा अधिनियम लागू करावा, आदि मागण्या करण्यात येऊन कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सीटूचे राज्य उपाध्यक्ष कल्पना शिंदे, साधना झोपे आदिंसह नेते उपस्थित होते.येथील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसदर्भात कामगार उपआयुक्तांचेदेखील लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र पुढे काहीही होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)
सेवेत कायम करण्यासाठी कंत्राटी कामगार सरसावले
By admin | Updated: May 18, 2016 22:59 IST