सारडा सर्कलवरील वडाळा नाक्याजवळ समीर खान आणि मझहर खान (दोघे रा. चौकमंडई) या भावंडांचे मांस विक्रीचे दुकान आहे. याच दुकानाच्या बाजूला संशयित इम्रान पठाण याचेही मांस विक्रीचे दुकान आहे. रविवारी संशयित इमरान याने ग्राहकांना ‘आमच्या दुकानात या...’ असे म्हणून ग्राहक पळवण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे खान याने त्यास आक्षेप घेत जाब विचारला. या कारणावरून दोघांमध्ये तेव्हा वाददेखील झाले व पठाण याने खान बंधूंना धमकावले. त्यानंतर खान याने भद्रकाली पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी अदखलपात्र म्हणून त्याची नोंद केली. दरम्यान, पोलिसांकडे तक्रार का केली, अशी कुरापत काढून पठाण याने सोमवारी दुपारच्या सुमारास खान बंधूंवर कोयत्याने हल्ला चढविला. यात दाेघे भाऊ जखमी झाले आहेत. तसेच संशयित हल्लेखोर पठाणही जखमी झाल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याची माहिती भद्रकाली पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक साजन साेनवणे यांनी दिली. तक्रारीची पाेलिसांकडून वेळीच दखल घेतली गेली असती तर हा जीवघेणा हल्ला झाला नसता, असे जखमींचे म्हणणे आहे. याप्रकरणी संशयित इमरानवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी भद्रकाली पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर आणि मझहर खान (दोघे रा. चाैकमंडई) अशी जखमी झालेल्या दाेघा भावांची नावे आहेत. त्यांच्यासह संशयित आरोपी इमरान हासुद्धा जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ग्राहक पळवापळवीच्या वादातून भररस्त्यात विक्रेत्यांमध्ये धुमश्चक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:15 IST