सटाणा : ग्रामीण भागातील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीचे व्यासपीठ असलेल्या ‘साहित्यायन’ या संस्थेचे २६ वे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन येत्या ३० सप्टेंबरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व कवी प्रा. वसंत डहाके यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती साहित्यायनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी दिली.साहित्यायन संस्थेतर्फेअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी त्या-त्या वर्षी नियुक्त झालेल्या अध्यक्षांना सटाणा येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान आजपर्यंत देण्यात आला आहे. यंदाचे साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दीचे औचित्य साधून आयोजित केले जात आहे.संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा भांड यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशनही होणार असून, ‘मराठी साहित्यातील विनोद हरवत चालला आहे’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. कवयित्री प्रभा गणोरकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील नामवंत कवींचे कविसंमेलन होईल. दरम्यान, यापुढे दरवर्षी ३० सप्टेंबरला साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले असल्याची माहितीही धोंडगे यांनी दिली आहे.
साहित्यायनचे ३० सप्टेंबरला संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 19:03 IST