नाशिक : शालेय विद्यार्थ्यांची आधार नोंदणी केल्याशिवाय विद्यार्थीसंख्या ग्राह्य धरण्यात येणार नाही, अशा स्वरुपाच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत, परंतु विद्यार्थ्यांच्या नोंदणीत आधार क्रमांक नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी आधार सेवा सुरू राहण्यासाठी दक्षता घेण्यासोबतच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून केवळ शाळांसाठी एक महिन्याचा विशेष आधार कॅम्प राबविण्याची मागणी खासगी प्राथमिक शिक्षक महासंघातर्फे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात शुक्रवारी (दि. १७) झालेल्या बैठकीत शाळा मान्यता, आरटीई प्रमाणपत्र, डीसीपीएस स्लिपा, भविष्य निर्वाह निधीच्या स्लिपा आदी विविध विषयावर चर्चा झाली. डीबीटी (डायरेक्ट बँक ट्रान्सफर), उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार यासह खासगी प्राथमिक संघाच्या विविध अडचणीविषयी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना माहिती देण्यात आली.या बैठकीत महासंघाचे जिल्हाध्यक्ष नंदलाल धांडे, सचिव सुनील बिरारी, ग्रामीण संपर्कप्रमुख साळुंखे तसेच अमित श्रीधर देवरे, वेतन पथक अधीक्षक नंबर बैठकीस उपस्थित होते.
180921\18nsk_17_18092021_13.jpg
प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात प्राथमिक शिक्षक व शाळांच्या विविध समस्यांविषयी चर्चा करताना प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी