त्र्यंबकेश्वर : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सध्या पालिका कार्यालयासह प्रत्येक विभागात कंत्राटी कामगार, नाका लिपिक, कार्यालयीन लिपीक, पाणीपुरवठा कुली असे मिळून जवळपास ५० ते ६० कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. आॅगस्ट आणि सप्टेंबर या महिन्याचा पगार शासनाकडून मिळेल. पण वर्षभराच्या कालावधीसाठी शासन निधी देणार नाही. त्यामुळे यासाठी पैसा कसा उभा करावा असा यक्ष प्रश्न पालिका प्रशासनापुढे उभा राहिला आहे.नगरपालिकेला तशी कर्मचाऱ्यांची नितांत गरज आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर येथे दररोज २५ ते ३० हजार किंबहुना कधी कधी जास्तही संख्येने भाविक येऊ शकतात. जानेवारी महिन्यातील निवृत्तीनाथ यात्रा व महाशिवरात्रीच्या या सिंहस्थ कालावधीतच येणार आहेत. याशिवाय पालिकेची झालेली हद्दवाढ यामुळे मनुष्यबळाची गरज आवश्यक ठरणार आहे. एकिकडे शासन पालिकेत नवीन पदे मागू नये, गरज पडल्यास कंत्राटी पद्धतीने कामगार नियुक्तीचे आदेश दिले आहे तर दुसरीकडे कंत्राटी पद्धतीने जरी भरती केली तरी त्यांना किमान वेतन देण्याच्या सूचना आहेत. यापूर्वी रु. १८०/- रोजंदारी होती. त्यानंतर रु. २२५ रोज करण्यात आला. आता तसा दैनिक रोज ४२७ रुपये करावे असे आदेश खुद्द शासनाचेच आहे. अशा परिस्थितीत कारभार कसा करावा असा प्रश्न नगरपालिका प्रशासनासमोर उभा राहिला आहे. (वार्ताहर)