-----
कापूस वेचणी अंतिम टप्प्यात
मालेगाव : माळमाथ्यासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड झाली असून कापूस वेचणी अंतिम टप्प्यात आली आहे. आधी बेमोसमी पाऊस व रोगट हवामानामुळे कापसाचे उत्पादन घटले असून, कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत आहे.
----
ट्रकच्या धडकेत दोन जखमी
मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावर झोडगे शिवारात मालेगावकडून धुळ्याकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक जीजे १२ एवाय ८७७२ ने दुचाकी क्रमांक एमएच ४१ एएस १३९४ ला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार विशाल जगन्नाथ वरखेडे (२८) व त्याच्या पाठीमागे बसलेला सुरेश किशोर वरखेडे (११) दोघे जखमी झाले. शनिवारी दुपारी हा अपघात झाला. तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----
रोटरॅक्ट क्लब लूम सिटीची वार्षिक तपासणी
मालगाव : रोटरॅक्ट क्लब ऑफ मालेगाव लूम सिटीची वार्षिक तपासणी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष अभिषेक गोयल, माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे, उदय कुलकर्णी, मिडटाऊनचे अध्यक्ष राजेंद्र देवरे, सचिव केशव खैरनार, राजेंद्र दिघे, कुंदन चव्हाण, दिलीप भावसार, सतीश कलंत्री आदी उपस्थित होते. गाेयल यांनी लूम सिटीचे विविध प्रकल्प व कोरोना काळात केलेल्या कामांचा गाैरव केला. भावेश अमृते यांनी अहवाल सादर केला. निशिता भावसार, अश्विनी बागड यांनी सूत्रसंचालन केले. ऋतुजा भामरे यांनी आभार मानले.
-----
संवेदनशील ग्रामपंचायतींवर पोलिसांचे लक्ष
मालेगाव : तालुक्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत संवेदनशील ग्रामपंचायतींकडे तालुक्यातील पोलिसांचे लक्ष असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तालुक्यात काही गावांमध्ये मोर्चेबांधणी सुरू असून उमेदवारांना पॅनलमध्ये घेण्यासाठी चुरस लागली आहे. दरवेळी निवडणुकांमध्ये होणाऱ्या हाणामाऱ्या लक्षात घेता पोलिसांनी संवेदनशील गावांकडे विशेष लक्ष दिले आहे.
----