सटाणा : नाशिक जिल्ह्यातील पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीचोरी रोखण्यासाठी यंत्रणेला आदेश दिले होते. मात्र या आदेशाची महावितरण आणि जलसंपदा विभागाकडून पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास आले आहे.बागलाण तालुक्यातील जाखोड लघुप्रकल्पामधून प्रकल्पातच पंप टाकून काही जण राजरोस पाण्याची चोरी करत आहेत. या प्रकाराबाबत शेतकऱ्यांनी तक्रार करूनही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.जुलै महिन्यातला आठवडा उलटला तरी बागलाण तालुक्यातील धरण क्षेत्रावर अद्यापही पावसाचा थेंबही बरसला नाही. तालुक्यातील महत्त्वाच्या प्रकल्पातील मृतसाठाही निम्म्यावर आल्यावर जलसंकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पाणीटंचाईशी सामना करण्यासाठी पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन करण्याबरोबरच पाणीचोरी रोखण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले होते. मात्र बागलाण तालुक्यातील करंजाडी नदीवर बांधलेल्या जाखोड लघुप्रकल्पात बेकायदा वीजजोडणी करून चक्क प्रकल्पाात पंप टाकून पाणीचोरी सुरू आहे. याच पाण्यावरून गेल्या दीड वर्षांपूर्वी मुंगसे आणि पिंगळवाडे या दोन गावांमध्ये पाइपलाइनने पाणी नेल्यावरून दंगल उसळली होती. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असताना गेल्या काही दिवसांपासून पाणीचोरी सुरू केली असल्याच्या तक्रारी आहे. सध्या या लघुप्रकल्पात मृतसाठा निम्म्यावर आला असून, पाणीचोरी अशीच सुरू राहिल्यास नागरिकांबरोबरच गुरे आणि वन्यजिवांवर जलसंकट येऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. त्यामुळे यंत्रणेने तातडीने पाणीचोरी थांबवावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत. (वार्ताहर)
लघुप्रकल्पातून पाणीचोरी होत असल्याची तक्रार
By admin | Updated: July 19, 2014 01:09 IST