नांदगाव : बोलठाण कांदा मार्केटमध्ये कांद्याचे भाव बघून गोंडेगाव कडे घरी जात असताना दोघांनी शेषराव गवळी (६५) यांना मारहाण केली त्यात त्यांचे पायाचे हाड मोडल्याची घटना घडली आहे.
सदर घटना गोंडेगाव रस्त्यावर गोकुळ शेठ यांच्या गोडावून जवळ घडली. संशयित दिगंबर सरोवर व भगवान सरोवर दोघे रा. गोंडेगाव यांनी शेषराव यांना मारहाण करत खाली पाडले. त्यावेळी भगवान मोटार सायकलवर येऊन त्याने शेषराव यांच्या उजव्या पायाच्या खुब्यावर लाथ मारली. त्याला तडा जाऊन ते गंभीर जखमी झाले. शेषराव नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
-----------------------------------------
नांदगावी गणेश विसर्जनासाठी व्यवस्था
नांदगाव : नांदगाव नगरपरिषदेच्या वतीने या वर्षी श्री गणेश विसर्जनासाठी शहरातील शिवाजी चौक, नगरपरिषद कार्यालयासमोर कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद रोड, येवला रोड (मार्केट कमिटी) व जैन धर्मशाळा या ठिकाणी श्री गणेश मूर्ती संकलन केंद्र व निर्माल्य संकलन कलश ठेवण्यात येणार आहे. आपले घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती नदीमध्ये अथवा धरणांमध्ये विसर्जित न करता ती नगरपरिषदेने केलेल्या व्यवस्थेवर विसर्जन करून प्रदूषण रोखण्यास खारीचा वाटा उचलूया असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.