थेट व्यापाऱ्यांच्या खळ्यावर होणार शेतमाल विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 10:40 PM2021-05-12T22:40:31+5:302021-05-13T00:35:10+5:30

लासलगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक करण्यात आले असून, त्यात गर्दी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचेही व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत; मात्र शेतमाल विक्रीसाठी त्या-त्या बाजार समित्यांनी पर्यायी व्यवस्था करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार लासलगाव बाजार समितीने घेतलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना थेट व्यापाऱ्यांच्या प्लॉटवर अथवा खळ्यांवर जाऊन शेतमाल विक्री करता येणार असून त्या व्यवहारास बाजार समितीची मान्यता असणार आहे.

Commodities will be sold directly to traders | थेट व्यापाऱ्यांच्या खळ्यावर होणार शेतमाल विक्री

थेट व्यापाऱ्यांच्या खळ्यावर होणार शेतमाल विक्री

Next
ठळक मुद्देबाजार समित्यांचे कामकाज बंद : रोज कोट्यवधींची उलाढाल ठप्प; लिलाव बंदला शेतकऱ्यांचा विरोध

लासलगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक करण्यात आले असून, त्यात गर्दी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचेही व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत; मात्र शेतमाल विक्रीसाठी त्या-त्या बाजार समित्यांनी पर्यायी व्यवस्था करावी, अशा सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार लासलगाव बाजार समितीने घेतलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना थेट व्यापाऱ्यांच्या प्लॉटवर अथवा खळ्यांवर जाऊन शेतमाल विक्री करता येणार असून त्या व्यवहारास बाजार समितीची मान्यता असणार आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी शेतीमालाचे लिलाव बंद कालावधीत शेतकऱ्यांनी व्यापारी वर्गाशी संपर्क साधून शेतीमालाची खरेदी-विक्री करण्याचे आवाहन केले आहे. लासलगाव मुख्य बाजार आवारावरील सर्व शेतीमालाच्या लिलावाचे कामकाज बुधवार, दि. १३ ते रविवार, दि. २३ मे पर्यंत पूर्णत: बंद राहणार आहेत. ज्या शेतकरी बांधवांना आपला शेतीमाल बाजार समितीच्या अनुज्ञाप्तीधारक अडते / व्यापाऱ्यांना त्यांच्या प्लॉटवर (खळ्यांवर) जाऊन विक्री करावयाचा असेल, अशा शेतकरी बांधवांनी संबंधित अडते / व्यापारी यांच्याशी दूरध्वनी अथवा इतर माध्यमांद्वारे संपर्क साधून आपला शेतीमाल विक्री करावा.

सदर व्यापाऱ्यांच्या प्लॉटवर (खळ्यांवर) बाजार समितीचे अनुज्ञाप्तीधारक हमाल व तोलार यांच्या समक्ष झालेल्या व्यवहारास बाजार समितीची अधिकृत मान्यता राहील. विक्री करावयाच्या शेतीमालाची प्रत पाहून भाव निश्चित करण्यात यावा. ज्या शेतकऱ्यास मालाचा भाव पसंत पडेल, असा माल विक्री केल्यानंतर बाजार समितीच्या अधिकृत तोलाराकडून काटापट्टी घेऊन त्याप्रमाणे संबंधित अडते / खरेदीदार यांच्याकडून अधिकृत हिशोब पावतीप्रमाणे शेतीमाल विक्रीची चुकती रक्कम रोख स्वरूपात त्याच दिवशी घेण्याची जबाबदारी संबंधित मालकाची राहणार आहे.

कोणत्याही शेतकरी बांधवांनी आपला शेतीमाल उधारीवर विक्री करू नये, केल्यास त्याची कोणतीही जबाबदारी बाजार समितीची राहणार नाही. असेही सभापती सुवर्णा जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

तीस कोटींची उलाढाल ठप्प होणार
दहा दिवसात अंदाजे प्रतिदिन तीन कोटी रुपये तर दहा दिवसात तीस कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होऊन ऐन खरीप हंगामाच्या मशागतीसाठी रक्कम कशी उभी करावयाची ही मोठी समस्या शेतकऱ्यांपुढे निर्माण होणार आहे.

दरम्यान, बुधवारी (दि.१२) लासलगाव बाजार समितीत केवळ सकाळी अकरा वाजेपर्यंत फक्त कांदा लिलाव झाले. १० हजार ४०० क्विंटल उन्हाळा कांदा ७०० ते १५५५ व सरासरी १२०० रुपये तर ५४० क्विंटल लाल कांदा ५०० ते ९९० व सरासरी ७५० रुपये भावाने विक्री झाला असून गुरुवारपासून लिलाव बंद राहणार आहेत.

शेतकऱ्यांपुढे समस्यांचा डोंगर
पणन संचालनालयाने परिपत्रक काढून सलग तीन दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस बाजार समित्यांमध्ये शेतीमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवता येणार नाहीत, असे म्ह॔ंटले असले तरी कोरोना उपाययोजना होण्यासाठी हे लिलाव बंद असतील. लासलगाव मुख्य आवार व उपबाजार बंद राहिल्याने कांदा उत्पादकांची गैरसोय होणार आहे. एकीकडे उत्पादनात घट, वेळेवर विक्री न झाल्याने प्रतवारीत घसरण, उत्पादन खर्चाच्या खाली दर, अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. अगोदरच मार्चअखेर लिलाव बंद होते. आता पुन्हा लिलाव बंद ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

शेतकऱ्यांचा लाल कांदा नाशवंत आहे. अगोदर बाजार समित्या बंद राहिल्याने मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कामकाज बंद होत आहे. जर व्यापारी कामकाज बंद ठेवणार असतील तर सरकारने हमीभावाने कांदा खरेदी करावा, अन्यथा नुकसान टाळण्यासाठी बाजार समित्या सुरू ठेवा.
- भारत दिघोळे, प्रदेशाध्यक्ष, कांदा उत्पादक संघटना

कोरोना रुग्णसंख्या वाढल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने लिलावाचे कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाचे देखील मोठे नुकसान होणार आहे. कामगारांचे पगार व इतर व्यवस्थापन खर्च याचा बोजा व्यापारी वर्गाच्या अंगावर पडणार आहे. लिलाव बंद राहिल्याने जसे कांदा उत्पादक यांचे नुकसान होते तसेच व्यवहार बंद झाल्याने व्यापारी वर्गाचेही होणार आहे.
- मनोज जैन(रेदासणी ), कांदा व्यापारी, लासलगाव

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू नये याकरिता विविध उपाययोजना कडक केल्या पाहिजेत. सध्या शेतीमालाच्या मशागतीला भांडवलाची गरज आहे. त्यामुळे शेतीमालाचे लिलाव बंद करणे म्हणजे रोगापेक्षा जालीम उपाय केला असेच म्हणावे लागेल.
- राजेंद्र होळकर, कांदा उत्पादक. लासलगाव

सायखेड्यात ४६ लाखांना बसणार फटका
सायखेडा : सायखेडा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कांदा लिलाव बंद करण्यात आले असून एका दिवसाची सुमारे ४६ लाख ५६ हजार रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प होणार असून बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व मजूर, माल वाहतूक गाडी चालक मालक, हमाल हा घटक संकटात सापडला आहे.
शासन निर्णयामुळे बाजार समिती बंद झाल्या असल्याने शेतकऱ्यांचा कांदा विक्री थांबणार आहे. दररोज साडेसहा हजार क्विंटल कांदा सायखेडा बाजार समितीत विकला जातो. दहा दिवस मार्केट बंद असल्यामुळे ६ लाख ५० हजार क्विंटल इतका कांदा विक्रीसाठी थांबणार आहे. अगोदरच बाजारभाव कमी आहे. बाजार समिती सुरू झाल्यावर आवक वाढून दुप्पट कांदा विक्रीसाठी येईल. पर्यायाने आवक वाढली तर भाव पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागणार असल्याचे शेतकरी बोलत आहेत. बाजार समिती सुरू ठेवून कांदा विक्री सुरु ठेवावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

सायखेडा बाजार समिती अंतर्गत एक दिवसाला साधारण साडेसहा हजार क्विंटल कांदा खरेदी विक्री केला जातो. बाजार समिती आवारात शारीरिक अंतर ठेवून ट्रॅक्टरने सॅनिटायझर फवारणी केली जाते, बाजार समिती कर्मचारी योग्य काळजी घेतात. या परिसरातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही. त्यामुळे बाजार समिती बंद ठेवणे यावर पर्याय नाही.
- अनंत भुतडा, कांदा व्यापारी. सायखेडा

गावठी कांदा चाळीत मोठ्या प्रमाणात साठवून ठेवला जातो. चाळी पूर्ण भरल्या आहेत, शिल्लक असलेला कांदा शेतात पडून आहे. वाढते ऊन आणि अचानक येणारा पाऊस यामुळे उघड्यावर असलेला कांदा खराब होऊ शकतो. दहा दिवस मार्केट बंद असल्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
- कैलास डेर्ले, शेतकरी, शिंगवे

माल विक्री बंद झाल्याने शेतकरी हतबल
नांदूरशिंगोटे : बाजार समित्या बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार असलेल्या नांदूरशिंगोटे येथे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे.
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे तालुक्यातील नांदूरशिंगोटे व दोडी बुद्रुक येथे उपबाजार आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे दोडी येथील उपबाजार बंद असल्याने पंधरा ते वीस दिवसांपासून नांदूरशिंगोटे येथे आठवड्यातून तीन वेळेस कांदा लिलाव होत होते. येथील उपबाजारात कांदा विक्री केल्यानंतर तत्काळ शेतकऱ्यांना शेती मालाचे पेमेंट मिळत असल्याने येथील उपबाजाराला शेतकऱ्यांची पसंती आहे. नांदूरशिंगोटे येथेही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने जनता कर्फ्यू लागू करण्यात आल्याने उपबाजार बंद ठेवण्यात आला आहे.
गत एप्रिल महिन्यात येथील उपबाजारात ८३ हजार ४७५ क्विंटल कांद्याची आवक होती. तर अंदाजे एक हजार रुपयांच्या आसपास भाव मिळाला होता. उपबाजारात लाल व उन्हाळी अशा दोन्हीही प्रकारच्या कांद्याची आवक होती. तर गत महिन्यात उपबाजारात सुमारे ७ कोटी ९३ लाख रुपयांची उलाढाल झाली. तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन कोटी रुपयांच्या आसपास उलाढाल झाली आहे.

गत महिन्यात परिसरात गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याने कांद्याची प्रतवारी खराब झालेली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कांदा साठवणीसाठी साधन नसल्याने तसेच बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. खरेदी केलेला कांदा वेळेत विक्री न केल्यास त्याचा तोटा सहन करावा लागणार आहे.
- रवींद्र शेळके, कांदा अडतदार

गतवर्षी व यावर्षीही सततच्या पावसाने कांदा बियाणे खराब झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. सध्या कांद्याला मिळणारा दर लक्षात घेता झालेला खर्चही निघत नाही. खरीप हंगाम तोंडावर आल्याने प्रशासनाने कांदा विक्रीसाठी बाजार समित्यांना नियोजन करून देणे आवश्यक होते. कोरोनाचे नियम पाळून बाजार समिती सुरू ठेवल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल.
- सोमनाथ भाबड, शेतकरी

Web Title: Commodities will be sold directly to traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.