नाशिक : वैदिक सनातन धर्म सध्या अडचणीत आलेला असून, साधू-संतांनी सर्व लहान मोठे मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे, असे प्रतिपादन नरेंद्राचार्य महाराज यांनी केले. सनातन वैदिक धर्म सभेतर्फे धर्म संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून महाराज बोलत होते.साधुग्राममधील नरेंद्राचार्य महाराज नगरात धर्मसंमेलन झाले त्यावेळी नरेंद्राचार्य म्हणाले की, धर्मसभेची परवानगी असल्याशिवाय कोणीही महाराज होऊ नये. त्यामुळे श्रद्धावान लोक कमी होतात. प्रत्येक साधूने धर्माचरण पाळावे. त्यासाठी आखाडा परिषदेने प्रयत्न करावेत, हिंदू धर्माला जाती पाती मान्य नाहीत. हिंदू हीच मानवता आहे. त्यामुळे धर्माबद्दल जागृत राहिले पाहिजे. यावेळी हंसदेवाचार्य महाराज म्हणाले की, हिंदू धर्माला उच्च ठिकाणी पोहचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी सांगितले की, मानवता धर्माचे नाव हिंदू धर्म आहे. याप्रसंगी वारकरी संप्रदायाचे अमृतदास महाराज, विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जिव्हेश्वर महाराज, मोहन बुवा रामदासी महामंडालेश्वर धर्मवीर महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, महंत हेमंतदास महाराज, इंद्रदेव महाराज, महामंडलेश्वर भय्यादास महाराज, संतोषगिरी महाराज आदिंनी आपले विचार मांडले. प्रास्तविक वैदिक धर्मसभेचे अध्यक्ष भालचंद्र शास्त्री शौैचे यांनी केले. सूत्रसंचालन माधवदास महाराज यांनी केले. (प्रतिनिधी)
वैदिक धर्मातील मतभेद विसरून एकत्र यावे
By admin | Updated: September 1, 2015 23:46 IST