रंगीबेरंगी पतंगांनी नभांगण सजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 05:39 PM2020-01-15T17:39:51+5:302020-01-15T17:40:42+5:30

सिन्नर : शहर परिसरातील मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पंतगोत्सव साजरा होत असतांना नभांगण विविध आकारातील रंगीबेरंगी पतंगांनी सजल्याने आकाशाने ‘रंगपंचमी’ची अनुभूती घेतली.

 Colorful moths adorn the sky | रंगीबेरंगी पतंगांनी नभांगण सजले

रंगीबेरंगी पतंगांनी नभांगण सजले

googlenewsNext

सकाळपासून  बालगोपाळ व तरुण अमाप उत्साहाने देहभान हरपून या पतंगोत्सवात सहभागी झाल्याचे चित्र शहरात सर्वत्र दिसून आले.दरम्यान, शहर व तालुक्यात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जात असतांना आर्यन विलास नवाळे (१२) या मुलाचा पतंग उडवितांना विहिरीत पाय घसरुन मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत होती. बुधवार उजाडताच युवकांनी पतंगबाजीला प्रारंभ केला होता. या दिवशी काही शाळांना सुटी आल्याने या दिवशी आनंदाला भरती आल्याचे चित्र दिसत होते. शहर परिसरातील मैदाने आणि प्रत्येक इमारतीच्या गच्चीवर आज पतंग उडविणाऱ्यांचाच कब्जा दिसत होता. वरुन ‘ढील दे रे’ ‘कटलीऽऽरेऽ अशा आरोळ्या ऐकू येत होत्या. नेहमीच्या दुकानांव्यतिरिक्त चौकाचौकात पतंग विक्रीसाठी थाटण्यात आलेली दुकाने बालगोपाळ व तरुणांच्या गर्दीने फुलून गेली होती. पतंग व मांजा खरेदी करण्या बरोबरच कटलेला पतंग व मांजा पकडण्यासाठी रस्तोरस्ती जीव तोडून व भान हरपून धावणारी मुले दिसत असल्याने वाहतुकीतही अडथळे येत होते. विविध शाळांच्या मैदानांवर इमारतींच्या छतांवर जिकडेतिकडे पतंग उडविण्याची लगबग व गलबलाट सुरु होता. जवळपास प्रत्येक गच्चीवर लागलेले लाऊडस्पीकर्स, टेपरेकॉर्डर व डीजे वाजतांना दिसत होती. तर ब-याच हौशी पतंगप्रेमींनी ढोल ताशे आणून त्यांच्या गजरात पतंग उडविण्याचा आनंद लुटला. लहान मुलेही पतंग उडविण्यासाठी मोठ्यांची बरोबरी करण्याचा हट्ट करीत होते. पतंग कटल्यावर पुन्हा खरेदी करायची, दुस-याचा उंच जाणारा पतंगाचा दोरा काटायचा या चढाओढीच्या आनंद घेणा-या पतंगप्रेमींची संख्या यंदा जास्तच वाढल्याचे दिसून आले.

Web Title:  Colorful moths adorn the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kiteपतंग