नाशिक : शहरात ठिकठिकाणी महापालिकेने रस्त्याची कामे करताना झाडांच्या बुंध्यांभोवती सीमेंट कॉँक्रीट, पेव्हर ब्लॉकचा टाकलेला फास काढून घेण्याचा आदेश जिल्हा न्यायालयाने देऊनही कार्यवाही होत नसल्याने अखेर याचिकाकर्ते जगबिर निर्मल सिंग यांनी थेट वनमंत्र्यांकडे धाव घेतली असून, येत्या १२ जुलै रोजी सनदशीर मार्गाने झाडांचे बुंधे कॉँक्रीटपासून मुक्त करण्याचा इशारा दिला आहे. शहरात महापालिका व जिल्हा प्रशासनाने ठिकठिकाणी रस्त्यांसह अन्य विकासाची कामे करताना झाडांच्या बुंध्यांना सीमेंट कॉँक्रीट, पेव्हर ब्लॉक्स, डांबरीकरण यांनी जखडून टाकलेले आहे. त्यामुळे झाडांची वाढ खुंटली असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते जगबिर सिंग यांनी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. सदर दाव्याचा निकाल २८ नोव्हेंबर २०१५ रोजी लागला आणि न्यायालयाने जिल्हा प्रशासन व महापालिकेला संबंधित झाडांचे बुंधे कॉँक्रीटमुक्त करण्याचे आदेशित केले होते. याशिवाय, झाडांना दोन फुटाचे गोलाकार आळे करावे, अशी सूचनाही करण्यात आली होती. परंतु, न्यायालयाच्या आदेशानंतरही जिल्हा प्रशासन व महापालिकेने त्यावर काहीच कार्यवाही केलेली नसल्याने याचिकाकर्ते जगबिर सिंग यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र पाठवून दखल घेण्याची विनंती केली आहे. महापालिका व जिल्हा प्रशासनाने याबाबत कार्यवाही न केल्यास येत्या १२ जुलै रोजी सदर झाडांभोवती असलेले कॉँक्रीटीकरण तसेच पेव्हर ब्लॉक्स हटविण्यात येतील, असा इशारा जगबिर सिंग यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
झाडांच्या बुंध्यांना कॉँक्रीटचा फास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2016 00:36 IST