नाशिक : नदीपात्रात जाणाऱ्या नैसर्गिक नाल्यांना जोडलेल्या गटारी बंद करण्यात येणार असून, त्यातील सांडपाणी मलवाहिकांना जोडून प्रक्रियेसाठी मलनिस्सारण केंद्रात पाठविले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. याचबरोबर स्मार्ट सिटी अंतर्गत गोदावरी नदीपात्रातील कॉँक्रिटीकरण हटविले जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. गोदावरी नदी प्रदूषणासंबंधी उच्च न्यायालयात दाखल झालेली जनहित याचिका आणि त्यानुसार न्यायालय तसेच सल्लागार म्हणून नेमलेल्या ‘निरी’ या संस्थेने केलेल्या शिफारसी यावर अंमलबजावणीकरिता चर्चा करण्यासाठी आयुक्तांनी त्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला निरीचे संचालक डॉ. राकेश कुमार, मविप्रच्या वास्तुशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्राजक्ता बस्ते, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र पाटील, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, याचिकाकर्ते निशिकांत पगारे आणि राजेश पंडित, शहर अभियंता संजय घुगे, पर्यावरण विभाग प्रमुख वंजारी आदी उपस्थित होते. यावेळी गोदावरी नदीला येऊन मिळणारे नैसर्गिक नाले पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार, नाल्यांना जोडल्या गेलेल्या गटारी बंद करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आणि सदर सांडपाणी मलनिस्सारण केंद्राकडे वळविण्याच्या सूचना केल्या. यावेळी निरीचे संचालक राकेशकुमार यांनी निरीने सुचविलेल्या शिफारशींची माहिती दिली. याचबरोबर रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रमाण वाढविण्याची गरज असल्याबाबत चर्चा झाली.दरम्यान, गोदापात्रातील कॉँक्रिटीकरणासंदर्भात चर्चा होऊन स्मार्ट सिटी अंतर्गत गोदा प्रकल्पात सदर कॉँक्रिटीकरण हटविण्याचा प्रस्ताव असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.गोदावरीला येऊन मिळणारे नालेगंगापूर गावापासून ते होळकर पुलापर्यंत मल्हारखाण, जोशीवाडा, चोपडा लॉन्स, देह मंदिर सोसायटी व चव्हाण कॉलनी, सुयोजित गार्डनमागे, आसारामबापू आश्रमातील भाग, चिखली नाला, सोमेश्वर नाला, बारदान फाट्याजवळील नाला, गंगापूर गावातील नाला तसेच पंचवटी भागात गांधारवाडी ते होळकर पुलापासून गांधारवाडी, कुसुमाग्रज उद्यानालगत, रामवाडी नाला, होळकर पुलापासून ते तपोवनपर्यंत सरस्वती नाला, नागझरी नाला, नासर्डी, वाघाडी, अरुणा, कपिला आदी नाले येऊन मिळतात. सदर नैसर्गिक नाले मोकळे करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.
नाल्यांना जोडलेल्या गटारी बंद करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:20 IST