नाशिक - केंद्र सरकारमार्फत घेण्यात येणा-या स्वच्छ सर्वेक्षणात अमृत योजनेतील पाचशे शहरांमध्ये नाशिकने आतापर्यंत कागदपत्रांच्या आधारे २२ व्या क्रमांकावर झेप घेतली असून येत्या ४ जानेवारी पासून प्रत्यक्षपणे सुरू होणा-या स्वच्छ सर्वेक्षणात यापेक्षाही अधिक चांगली कामगिरी करण्याचा निर्धार महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.स्वच्छता सर्व्हेक्षणासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिकच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आयुक्तांनी सांगितले, यंदा देशभरातील ४१४० शहरांसाठी स्वच्छता सर्वेक्षण होत आहे. जी शहरे अमृत योजनेत समाविष्ट आहे, त्यांची वेगळी स्पर्धा होत आहे. नाशिक महापालिकेने आतापर्यंत जी कागदपत्रे सादर केली आहेत, त्या आधारे १८०० गुणांमध्ये १६४१ गुण संपादन करत २२ व्या क्रमांकावर झेप घेतलेली आहे. महापालिकेने वर्षभरात खतप्रकल्प, घंटागाडी, वेस्ट टू एनर्जी, घनकचरा व्यवस्थापन यामध्ये केलेल्या कामगिरीची दखल त्यात घेण्यात आलेली आहे. याशिवाय, महापालिकेने तयार केलेल्या स्वच्छता अॅपलाही चांगला प्रतिसाद लाभत आहे. येत्या ४ जानेवारी पासून शहरात प्रत्यक्ष स्वच्छता सर्वेक्षणास प्रारंभ होणार आहे. त्यासाठी केंद्रीय पथकही येणार आहे. यंदा महापालिकेने स्वच्छता सर्वेक्षणाच्या दृष्टीने समाधानकारक कामे केली असून त्यामुळे प्रत्यक्ष सर्वेक्षणात आणखी कामगिरी उंचावण्याची अपेक्षाही आयुक्तांनी व्यक्त केली.बक्षिसांची घोषणामुख्यमंत्र्यांनी स्वच्छता सर्वेक्षणात पहिल्या दहा शहरांमध्ये येणा-या शहरांना २० कोटी रुपये, १० ते २० शहरांच्या यादीत येणाºया शहरांना १० कोटी तर आदर्श प्रभागासाठी २० लाख रुपये बक्षिस देण्याची घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी नाशिकला दत्तक घेतले असल्याने पहिल्या दहा शहरांच्या यादीत नाशिकचा क्रमांक यावा यासाठी प्रशासनाबरोबरच सत्ताधारी भाजपाचीही कसोटी लागणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकची डॉक्युमेंटेशनमध्ये २२ व्या क्रमांकावर झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 19:02 IST
आयुक्तांनी दिली माहिती : ४ जानेवारीपासून प्रत्यक्ष सर्वेक्षण
स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकची डॉक्युमेंटेशनमध्ये २२ व्या क्रमांकावर झेप
ठळक मुद्देयंदा देशभरातील ४१४० शहरांसाठी स्वच्छता सर्वेक्षणखतप्रकल्प, घंटागाडी, वेस्ट टू एनर्जी, घनकचरा व्यवस्थापन यामध्ये केलेल्या कामगिरीची दखल