नाशिक : गुजरातमधील कंपनीत गुंतवलेल्या भांडवलाच्या वसुलीसाठी कंपनीतील कमिशन एजंटचे अपहरण करून तीन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अटक केलेल्या तिघा संशयितांच्या पोलीस कोठडीत बुधवारी (दि़१७) न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे़ दरम्यान, या गुन्ह्यातील फरार संशयित तथा सातपूरच्या महिला नगरसेवक उषा शेळके यांचा मुलगा धिरज शेळके (रा़ सातपूर) व त्याचा साथीदार रवि कावळे या दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी दिली़गुजरातमधील विनटेक या गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपनीत संशयित ललित भानुभाई पटेल, हितेश अमृतलाल पटेल, संदीप गणेश पटेल (रा़ शंकरनगर, गंगापूररोड, नाशिक) यांनी दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती़ विनटेक कंपनीतील कमिशन एजंट दीपक कुकडिया याच्यामार्फत संशयितांनी गुंतवणूक केली होती़ मात्र गत तीन महिन्यांपासून ठरल्याप्रमाणे कमिशन वा भांडवल मिळत नसल्याने संशयितांनी कंपनीमालक जिग्नेश पानसरीया व दीपक कुकडीया यांना चर्चेसाठी नाशिकमध्ये बोलावून घेतले़ संशयित पटेल यांनी सातपूर विभागाच्या माजी प्रभाग सभापती उषा शेळके यांचा मुलगा धिरज शेळके व त्याचा साथीदार रवि कावळे यांची मदत घेऊन दीपक कुकडियाचे अपहरण करून त्याचे वडील मुकेश कुकडिया यांच्याकडे तीन कोटींची खंडणी मागितली़ मात्र भद्रकाली पोलिसांनी सापळा रचून दीपकची सुखरूप सुटका केली़ पोलिसांनी अटक केलेल्या तिघा पटेलांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती़ त्याची मुदत संपल्याने बुधवारी (दि़१७) न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत दोनदिवसांची वाढ करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
खंडणीतील संशयितांना कोठडी
By admin | Updated: August 18, 2016 00:51 IST