नाशिक : अखिल भारतीय चतु:संप्रदाय विरक्तचे अध्यक्ष श्री महंत महामंडलेश्वर लालबिहारी दास ऊर्फ बर्फानीदादा यांच्या अध्यक्षपदावर महंत दिनेशदास यांनी आक्षेप घेतला असून अध्यक्ष या नात्याने त्यांनी शाहीस्नान करू नये यासाठी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला आहे़ यावर न्यायालयाने सुनावणीसाठी १६ सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे़वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश सुनील पाटील यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दाव्यामध्ये देशभरातील सर्व साधू-महंत व आखाड्यांची अखिल भारतीय चतु:संप्रदाय विरक्त हे प्रमुख आहेत़ त्यामध्ये निर्माण संप्रदाय, मध्य गोरेश्वर संप्रदाय, विष्णू स्वामी संप्रदाय व रामानंदीय संप्रदाय असे चार प्रकार आहेत़ यातील रामानंदीय संप्रदायातील महंत हे अध्यक्ष तर उवरित तीन संप्रदायातील तीन महंत हे उपाध्यक्ष असतात़चतु:संप्रदायातील या चार संप्रदायाचे रक्षण करण्यासाठी निर्वाणी, दिगंबर व निर्मोही आखाड्यांची निर्मिती करण्यात आली़ चतु:संप्रदायाच्या प्रमुखांना श्री महंत महामंडलेश्वर असे म्हटले जाते़ या चतु:संप्रदाय विरक्तचे अध्यक्ष श्री महंत महामंडलेश्वर लालबिहारी दास ऊर्फ बर्फानीदादा हे आहेत़; मात्र बर्फानीदादा हे अध्यक्ष नसून मीच अध्यक्ष असल्याचा दावा महंत दिनेशदास यांनी न्यायालयात केला आहे़यामध्ये सरकार व पोलिसांना प्रतिवादी करून शनिवारच्या (दि़२९) शाहीस्नानामध्ये बर्फानीदादा यांनी अध्यक्ष या नात्याने स्नान करू देऊ नये, अशी मागणी महंत दिनेशदास यांनी न्यायालयात केली आहे़ याबरोबरच स्वत:सह आपल्या अनुयायांच्या स्नानाच्या स्वतंत्र व्यवस्थेची मागणीही केली आहे़ यावर न्यायालयाने १६ सप्टेंबर ही तारीख ठेवली आहे़ दरम्यान या दाव्याच्या कामकाजासाठी श्री महंत बर्फानीदादा तसेच दिनेशदास हे आपल्या अनुयायांसह न्यायालयात हजर होते़या दाव्यात महंत बर्फानीदादा यांच्या वतीने अॅड़नागनाथ गोरवाडकर, महंत दिनेशदास यांच्या वतीने अॅड़ अजय तोष्णीवाल तर शासन व पोलिसांच्या वतीने अॅड़ अजय मिसर यांनी बाजू मांडली़ (प्रतिनिधी)
श्री महंत बर्फानीदादांविरुद्ध न्यायालयात दावा
By admin | Updated: August 28, 2015 23:03 IST