नाशिक : शहर पोलिसांच्या मुख्यालय वसाहतीत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने साफसफाई मोहीम राबविण्यात आली. पोलिसांचे आरोग्य अबाधित राहिले तर शहराचे ‘आरोग्य’ टिकू न राहण्यास मदत होईल अर्थात शहरात कायदा सुव्यवस्था राखली जाईल. गेल्या अनेक महिन्यांपासून येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांना घाणीचा विळखा पडलेला आहे शहरात आढळून येणारे डेंग्यूचे रुग्ण व खराब झालेल्या हवामानामुळे पसरणारे विषाणूजन्य साथीच्या आजारांनीही पाय पसरले आहेत. त्यामुळे एकूणच नागरिकांच्या रोगप्रतिकार शक्तीवर विपरीत परिणाम होत असून, दोन दिवसांपासून बेमोसमी पावसाच्या हजेरीमुळे सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न व डासांच्या उपद्रवाची समस्या अधिक गंभीर बनण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलीस मुख्यालयाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेचा आमदार देवयानी फरांदे यांनी श्रीफळ वाढवून शुभारंभ केला. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे, सहायक आरोग्याधिकारी डॉ. सचिन हिरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पोलीस मुख्यालय वसाहतीत कौलारू घरे असल्यामुळे कौलांचीदेखील स्वच्छता करण्यास प्रारंभ करण्यात आला. कौलांवर साचलेला कचरा काढण्यापासून तर विविध रोपांच्या कुंड्यादेखील स्वच्छ करून त्यामध्ये हिवताप विभागाच्या कर्मचाऱ्यांनी औषध फवारणी केली. त्याचप्रमाणे पोलीस कुटुंबीयांच्या पाणीसाठ्याचे नमुनेही यावेळी तपासण्यात आले. दरम्यान, यावेळी आरोग्याधिकाऱ्यांनी काही पाणीसाठे तातडीने रिकामे करण्यास प्राधान्य दिले. आरोग्य विभागाकडून स्वच्छता व खबरदारीसंबंधी विविध सूचना यावेळी देण्यात आल्या. शिकाऊ प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांनीही तातडीने हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. परिसरातील काही पाणीसाठ्यांमध्ये अन्य अळ्या मिळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शहर पोलिसांच्या मुख्यालय वसाहतीत साफसफाई मोहीम
By admin | Updated: November 17, 2014 00:55 IST