नाशिक : तळेगावच्या घटनेचे पडसाद शहरातील विविध भागांमध्येही पहावयास मिळाले. राज्य परिवहन महामंडळाचे जाळपोळ व दगडफेक आंदोलनात मोठे नुकसान झाले. शहर बससेवाही आंदोलनामुळे प्रभावित झाली. आठ बसेसला शहराच्या विविध मार्गांवर दगडफेकीला सामोरे जावे लागले.शहर बससेवा दुपारी चार वाजेपासून ठप्प झाली. राज्य परिवहन महामंडळाने ग्रामीण भागातील बससेवेबरोबरच शहराची बससेवाही बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. दुपारनंतर मध्यरात्रीपर्यंत शहराच्या कुठल्याही मार्गावर बसेस धावत नव्हत्या. रविवारची सुटी असल्यामुळे नागरिक संध्याकाळी पाच वाजेनंतर घराबाहेर पडले; मात्र रस्त्यांवर बसेस उपलब्ध नसल्याने सर्वच बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसून आली. नागरिकांना शहरात वाहतुकीसाठी रिक्षांशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. रविवारची सुटी आणि नवरात्रोत्सवाची नवमी यामुळे संध्याकाळी ७ वाजेपासून तरुण, तरुणी, महिला विविध ठिकाणी दांडिया, गरबा खेळ्ण्यासाठी बाहेर पडले, परंतु पंचवटीच्या निमाणी, नाशिकरोड, सातपूर स्थानकांवरून सुटणाऱ्या सर्व बसेस मंडळाने बंद ठेवल्या होत्या.शहरातील अंबड, सातपूर, नांदूरनाका, सिडको, इंदिरानगर, सातपूर या मार्गांवर धावणाऱ्या शहर बसेसवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीमध्ये बसेसच्या काचा फुटल्या. सुदैवाने चालक, वाहकांसह प्रवासी सुरक्षित राहिले. दुपारनंतर विभाग नियंत्रण यामिनी जोशी यांनी शहर बससेवा बंद करण्याच्या सूचना आगारप्रमुखांना दिल्या. त्यानंतर सर्व बसेस आगारामध्ये थांबविण्यात आल्या. राज्य परिवहन महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. शहरामध्ये आठ बसेसवर दगडफेक झाल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांनी दिली आहे, तर ग्रामीण भागात किमान पंधरा ते वीस बसेसची जाळपोळ करण्यात आल्याचे वृत्त आहे.
शहर बससेवा दुपारपासून ठप्प
By admin | Updated: October 10, 2016 02:54 IST