सिडको : घंटागाडी अनियमित येणे हे नित्याचेच असताना गेल्या काही दिवसांपासून तर सिडको भागात आठ-आठ दिवस घंटागाडीच फिरकत नसल्याने महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.महापालिकेच्या वतीने नागरिकांंच्या घरातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे, परंतु या घंटागाड्या सध्या फिरकतच नसल्याने नागरिकांच्या घरात कचऱ्याचे ढीगच झाले आहेत. काही भागांत तर आठ-आठ दिवस उलटूनही घंटागाडी येत नसल्याच्या तक्रारी महिलावर्गाकडून केल्या जात आहे. संबंधित विभागाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे सिडको भागातील घंटागाड्यांचा बोजवारा उडाला. अनियमित घंटागाड्यांमुळे सिडकोतील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहे. नाशकात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली असतानाही मनपाचा आरोग्य विभाग मात्र सुस्तावेलाच आहे. अभियंतानगर भागातही अनियमित घंटागाड्यांमुळे महिलावर्गात तीव्र संतापाची लाट पसरलेली आहे. घंटागाडी आली तरी दिवसातून केव्हातरी येत असल्याने घंटागाडीची वाट पहावी लागत असल्याचेही येथील महिलांनी सांगितले. अनियमित व रामभरोसे येणाऱ्या घंटागाड्या या नियमित कराव्या, अशी मागणी महिलावर्गाकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)
सिडकोत घंटागाडीचा बोजवारा
By admin | Updated: October 2, 2015 23:36 IST