सिडको : सिडको भागात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी केंद्रांवर रांगा लागतात, परंतु अनेकदा डोस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने अनेकांना लस न घेताच माघारी फिरावे लागत आहे. यातच गुरुवारी सर्व्हर डाऊन असल्याने मोरवाडी येथील स्वामी समर्थ हॉस्पिटल व जुने सिडको येथील केंद्रांवर लसीकरण करण्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे अनेकांना लस न घेताच माघारी फिरावे लागल्याचे चित्र बघायला मिळाले.
सिडकोतील हेडगेवार चौक येथे नगरसेवक भाग्यश्री ढोमसे यांनी मनपाच्या माध्यमातून सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेत सकाळी सहा वाजल्यापासून रांगा लागतात. परंतु, अनेकदा लस कमी पडत असल्याने अनेक नागरिकांना लस न घेतात माघारी फिरावे लागत असल्याचे दिसून आले. मनपाच्या मोरवाडी येथील स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये सकाळपासूनच लस घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती, परंतु सर्व्हर डाऊन झाल्याने एक तासाहून अधिकवेळ वाया गेल्याने अनेक नागरिकांना लस घेण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागल्याचे चित्र बघायला मिळाले. विशेष म्हणजे लस घेणाऱ्यांमध्ये वयोवृद्ध नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. मनपाच्या जुने सिडको येथील केंद्रावर लस घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी होती. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने लसीकरणात अडथळा निर्माण झाला. अनेक नागरिकांना लस घेण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागले. दिवसभरात १५० ते २०० नागरिकांना लस दिली जाते, परंतु गुरुवारी सर्व्हर डाऊन असल्याने केवळ ४० ते ५० नागरिकांचेच लसीकरण झाल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.