लोकमत न्यूज नेटवर्क:सिडको : महापालिका निवडणुकीत सर्वत्र भाजपाची लाट असतानाही सिडको प्रभागात मात्र सेनेने आपले वचस्व कायम राखत एकहाती सत्ता मिळविली आहे. यामुळे साहजिकच सिडको प्रभागावर सेनेचाच भगवा फडणार यात शंका नाही, परंतु सेनेकडून नवीन चेहऱ्यांना की अनुभवी सदस्यांना संधी मिळणार, याबाबत उत्सुकता कायम आहे. सिडको विभागात एकूण सहा प्रभाग असून, यात प्रभाग क्रमांक २४, २५, २७, २८, २९ व ३१ आदिंचा समावेश आहे. या सहा प्रभागांतील २४ नगरसेवकांमध्ये सेनेचे १४, भाजपा ९ व राष्ट्रवादी कॉँग्रेस एक असे पक्षीय बलाबल आहे. सेनेच्या नगरसेवकांमध्ये सुधाकर बडगुजर, डी. जी. सूर्यवंशी, प्रवीण तिदमे, चंद्रकांत खाडे, श्यामकुमार साबळे, दीपक दातीर, सुदाम डेमसे, कल्पना पांडे, हर्षा बडगुजर, रत्नमाला राणे, कल्पना चुंभळे, सुवर्णा मटाले, संगीता जाधव, किरण गामणे आदिंचा समावेश आहे. स्थायी समितीवर शिवसेनेकडून नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी व प्रवीण तिदमे यांना संधी देण्यात आली आहे. तर सुधाकर बडगुजर, कल्पना पांडे, रत्नमाला राणे, हर्षा बडगुजर, कल्पना चुंभळे, सुवर्णा मटाले हे या आधीही नगरसेवक असल्याने त्यांचा अनुभव अधिक आहे. परंतु यापैकी एकाला मान द्यायचा की पहिल्यांदाच नगरसेवकपद भूषविणारे चंद्रकांत खाडे, श्यामकुमार साबळे, दीपक दातीर, किरण गामणे या नवीन चेहऱ्यांपैकी एकास संधी द्यायची याबाबत सेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून चर्चा केली जात आहे. सेनेतील अंतर्गत घडामोडींवरून सिडको प्रभागावर नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची दाट शक्यता जाणवत असली ऐनवेळी पक्ष कोणाला संधी देणार हे येत्या १९ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.
सभापतिपदासाठी सेनेत चुरस
By admin | Updated: May 15, 2017 01:14 IST