नाशिक : सार्वजनिक वाचनालय नाशिक संस्थेचा निवडणूक प्रचार जोर धरू लागल्यावर निवडणूकीच्या रिंगणातील पॅनलकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. गुरुवारी (दि. २३) ‘ग्रंथमित्र पॅनल’ने आपल्या प्रचाराचा शुभारंभ वाचनालयाबाहेर केल्याने ‘जनस्थान’ पॅनलने यावर आक्षेप घेत ग्रंथमित्र पॅनलचा मनमानी पद्धतीने कारभार चालू असल्याचे मत व्यक्त केले आहे.ग्रंथमित्र पॅनेलने गुरुवारी सकाळी ग्रंथ पूजन आणि ग्रंथ पालखी काढत आपल्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी शहरातील साहित्यिक प्रभाकर बागुल, रेखा भांडारे, एन. एम. आव्हाड, विजय पवार आणि अभिमन्यू सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथ पूजन आणि गं्रथ पालखी काढून तसेच कवी कुसुमाग्रज, मु. शं. औरंगाबादकर, वसंत कानेटकर, अ. वा. वर्टी यांच्या प्रतिमा पूजनाने प्रचाराचा आरंभ केला. सार्वजनिक वाचनालयाच्या बाहेर प्रचारानिमित्त काढण्यात आलेल्या ग्रंथ पालखीचा समारोप वाचनालयाच्या प्रवेश द्वाराजवळ करण्यात आल्याने जनस्थान पॅनलच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. बुधवारी जनस्थान पॅनलतर्फे प.सा.नाट्यगृहाच्या बाहेर लावण्यात आलेल्या फलक काढून घेण्याची तक्रार ग्रंथमित्र पॅनलतर्फे करण्यात आल्याने गुरुवारी तक्रार करणाऱ्या पॅनलनेच वाचनालय आवारात ग्रंथ पालखी कशी काढली, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.फलक आणि ग्रंथ पालखीवरून रणकंदन सुरू असताना ‘ग्रंथमित्र पॅनल’कडून सार्वजनिक वाचनालय या वास्तुचा प्रचार कार्यालय म्हणून वापर केला जात असल्याचाही आरोप जनस्थान पॅनलतर्फे करण्यात आला आहे. काळजीवाहू अध्यक्ष म्हणून प्रा. विलास औरंगाबादकर हे वाचनालयाचा कारभार बघत असले तरी निवडणुकी संबंधित कामे वाचनालयातून व्हायला नकोत, असेही मत जनस्थान पॅनलतर्फे व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक वाचनालयात सुुसूत्रता निर्माण व्हावी, असे दावे निवडणुकीतील उमेदवार करत असले तरी प्रत्यक्षात मात्र वाचनालयात असे चित्र बघायला मिळत नसल्याचा अनुभव वाचक सभासदांनादेखील येत आहे. (प्रतिनिधी)
प्रचारात आरोप-प्रत्यारोप नाट्य
By admin | Updated: March 24, 2017 00:20 IST