नाशिक : नाशिकहून भिवंडी येथे पिकअप व्हॅनमधून कोंबड्या घेऊन जाणाऱ्या चालकाला रस्त्यात अडवून कोंबड्यांसह व्हॅन पळवून नेणाऱ्या चोरट्यांना भद्रकालीतून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी चोरट्यांकडील ६८८ बॉयलर कोंबड्यादेखील हस्तगत केल्या आहेत. पोल्ट्री फॉर्ममधून भरलेल्या सुमारे ६८८ कोंबड्या घेऊन भिवंडी येथील मार्केटमध्ये जात असताना मुंबई-आग्रा महामार्गावर वेताळमाथा येथे तीन अज्ञात संशयितांनी दुचाकीवरून येत चालकास धमदाटी आणि मारहाण करून कोंबड्यांसह पिकअप व्हॅन पळविली होती. याप्रकरणी चालकाने घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी भद्रकाली येथून विक्री करण्यासाठी आणलेल्या चोरीच्या कोंबड्या घेऊन येणाऱ्या जफर लतीफ शेख (२५) रा. भद्रकाली, सुमित जॉर्ज हिवाळे (२३) रा. शरणपूररोड कॅनडा कॉर्नर आणि सद्दाम खलील शेख (२५) रा. वडाळा नाका यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ६८८ जिवंत कोंबड्या, महिंद्रा बोलेरो जीप आणि एक दुचाकी हस्तगत करण्यात आली. ताब्यातील संशयितांना घोटी पोलिसांपुढे हजर करण्यात आले.