नाशिक : लष्करभरती परीक्षेच्या पेपरफुटीसंदर्भात सीबीआय चौकशी सुरू करण्यात आली असून, पुन्हा नव्याने परीक्षा घेतल्या जाणार आहेत़ तसेच भविष्यात पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी परीक्षापद्धतीत बदल करण्यात येणार असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी सांगितले़ नाशिकमधील ठक्कर डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या डिजिधन मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़डॉ़भामरे यांनी सांगितले की, लष्कर पेपरफूट प्रकरण संरक्षण खात्याने गंभीरतेने घेतले असून सीबीआय चौकशी सुरू झाली आहे़ या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असून, दोषींविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे़ या चौकशीनंतर तयार करण्यात येणाऱ्या अहवालाचे विश्लेषण केले जाणार आहे़ भविष्यात पुन्हा या चुका होऊ नयेत यासाठी लष्कर भरतीची संपूर्ण परीक्षा पद्धतीतच बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़लष्करभरतीसाठी देशभरात रविवारी (दि़२६) लेखी परीक्षा होणार होती़ मात्र परीक्षेच्या आदल्या दिवशीच प्रश्नपत्रिका फुटल्याचे ठाणे गुन्हे शाखेने उघडकीस आणले़ ठाणे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, अकोला, वर्धा व नाशिक येथील २१ संशयितांना अटक केली असून, त्यामध्ये नाशिकमधील तिघांचा समावेश आहे़ या सर्वांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, या रॅकेटमध्ये माजी सैनिक, विविध करिअर अकॅडमीचे संचालक, जवान, अधिकारी तसेच विद्यार्थ्यांचाही समावेश आहे़
लष्कराच्या परीक्षापद्धतीत बदल : भामरे
By admin | Updated: March 4, 2017 01:11 IST