नाशिकरोड : कामांमध्ये पारदर्शकपणा व तत्परता राहण्याच्या उद्देशाने नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाणे पोलीस प्रशासनाने ‘नजरकैद’ केले आहे. स्थानकावरील संवेदनशीलता पाहता कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. दिवसेंदिवस नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील वाढत चाललेली प्रवाशांची गर्दी, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न यामुळे कामात पारदर्शकता व तत्परता असावी, या उद्देशाने पोलीस प्रशासनाने रेल्वे पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला होता. वास्तविक गेल्यावर्षी कुंभमेळ्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अत्यंत गरजेचे होते. परंतु उशिरा का होईना पोलीस प्रशासनाकडून नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात रविवारी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. ठाणे अंमलदार कक्षात दोन पोलीस कोठडीकरिता एक व पोलीस ठाण्याबाहेर दोन्ही बाजूला एक-एक असे एकूण पाच कॅमेरे बसवून रेल्वे पोलीस ठाणे नजरकैद करण्यात आले आहे. कामातील पारदर्शकता व तत्परताच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे होते. त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे पोलीस ठाण्याकरिता सोयी-सुविधायुक्त जागा उपलब्ध करून घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असून रेल्वेस्थानकावर राज्य रेल्वे पोलिसांची होणारी फरफट थांबविण्यासाठी खासदार, आमदारांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
रेल्वे पोेलीस ठाण्यावर सीसीटीव्ही कॅमेरे
By admin | Updated: April 26, 2016 23:53 IST