नाशिक : शहरातील उद्यानांची देखभालीअभावी होत असलेली परवड आता लवकरच संपुष्टात येणार असून महापालिकेने २८६ उद्यानांच्या देखभालीचे काम बचत गटांच्या हाती सोपविण्यासाठी ई-निविदा मागविल्या आहेत. महासभेच्या ठरावानंतर तब्बल सात महिन्यांनंतर उद्यानांच्या देखभालीबाबत प्रशासनाने हालचाल सुरु केली असून अधिकृत बचत गटांनाच तीन वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने उद्यान देखभालीचे काम दिले जाणार आहे. शहरात सुमारे ४७७ उद्याने आहेत. महापालिकेच्या मालकीच्या सुमारे १५० उद्यानांची देखभाल उद्यान विभागातील सुमारे २२० कर्मचाऱ्यांमार्फत केली जात आहे, तर काही उद्याने ही खासगी एजन्सीला देखभालीसाठी देण्यात आलेली आहेत. सदर एजन्सीची देखभालीची मुदत संपताच पुन्हा निविदा प्रक्रिया राबविली जात होती; परंतु त्यात सुसूत्रता नव्हती. त्यामुळे सर्व उद्यानांची एकत्रित निविदा काढण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी तयार केला होता आणि तो ६ एप्रिल २०१५ च्या महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. एकत्रित निविदाप्रक्रिया राबविल्यास स्पर्धा होऊन कमी दरामुळे पालिकेचा आर्थिक फायदा होऊ शकतो, असा दावा त्यावेळी आयुक्तांनी केला होता. आयुक्तांनी उद्याने ठेकेदाराच्या हाती देताना त्यासाठी एक ६३ कलमी कठोर नियमावलीही तयार केली होती. या नियमावलीनुसार सर्व जबाबदारी मक्तेदारावर निश्चित करण्यात आली होती शिवाय त्यात कामगार कायद्याचा भंग होणार नाही याची दक्षताही घेतली जाणार होती. सदर देखभालीचा ठेका हा तीन वर्षांच्या कालावधीसाठी दिला जाणार होता तर त्यासाठी सुमारे सात कोटी ४५ लाख रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. दरम्यान, महासभेने आयुक्तांचा प्रस्ताव फेटाळून लावत महिलावर्गाला रोजगार उपलब्ध होण्यासाठी त्यांच्या बचत गटांकडे उद्यान देखभालीचे काम सोपविण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यासाठी संबंधित महिलांना मुक्त विद्यापीठामार्फत उद्यान विद्येचे प्रशिक्षणही देण्याचे निश्चित करण्यात आले होते. महासभेचा ठराव होऊन तब्बल सात महिन्यांनंतर प्रशासनाने आता हालचाली सुरू केल्या असून, उद्याने देखभालीचे काम बचत गटांना देण्यासाठी ई-निविदाप्रक्रिया राबविण्याचे ठरविले आहे. मात्र, बचत गटांना काम देताना त्यांच्याकडून बचत गट स्थापनेचा ठराव, बॅँकेचे बचत गटाचे खाते असल्याचा पुरावा व संबंधित खात्याचे स्टेटमेंट, बचत गटातील कोणताही सभासद हा दुसऱ्या बचत गटाचा सभासद नसल्याबाबतचे बचत गटांच्या सदस्यांचे एकत्रित प्रतिज्ञापत्र ही कागदपत्रे निविदा भरताना संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक केले आहे. सदर निविदा प्रक्रिया ही २१ नोव्हेंबर रोजी पूर्ण केली जाणार आहे. उद्यानांचे काम बचत गटांना देण्याचे ठरविल्याने शहरातील वंचित महिलावर्गाला रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. (प्रतिनिधी)
उद्यानांची देखभाल बचतगटांच्या हाती
By admin | Updated: October 18, 2015 23:03 IST