नाशिक : रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी शासन पातळीवर विविध उपाययोजना राबविल्या जात असतानाच, कळवणच्या तत्कालीन प्रांत अधिकाऱ्यांनी त्यात भर घालत रेशन दुकानांमधून धान्य घेणाऱ्या प्रत्येक शिधापत्रिकाधारकाची कॅशमेमो पावतीवर स्वाक्षरी घेतानाच, धान्य वाटप यादीवरही स्वतंत्र स्वाक्षरी घेण्याचे रेशन दुकानदारांना बंधनकारक केले असून, ज्यांनी रेशनचे धान्य उचलले अशांची यादी चावडीवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रांत अधिकारी नीलेश जाधव यांनी मध्यंतरीच्या काळात कळवण व बहुचर्चित सुरगाणा तालुक्यातील रेशन दुकानांच्या केलेल्या तपासणीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आली होती, त्यातील चार दुकाने थेट रद्द करण्याचा प्रस्ताव त्यांनी सादर करतानाच, सार्वजनिक वितरण व्यवस्थेला सुरळीत करण्यासाठी काही उपाययोजना लागू केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला रेशन दुकानदाराने कॅशमेमो म्हणजेच धान्य घेतल्याची पावती देण्याचे बंधनकारक केले आहे. या पावतीवर रेशन दुकानदाराच्या स्वाक्षरीबरोबरच धान्य घेणाऱ्या ग्राहकांचीही स्वाक्षरी किंवा अंगठा जसा घेण्यात येईल, त्याचप्रमाणे धान्य वाटप पुस्तिका स्वतंत्र ठेवून त्यावरदेखील ग्राहकाचे नाव, शिधापत्रिका क्रमांक, धान्य घेतल्याची तारीख व स्वाक्षरी सक्तीची केली आहे. धान्य वाटप पुस्तिकेतील यादी रेशन दुकानदाराने तालुका तहसीलदारांना देणेही बंधनकारक करण्यात आले आहे. जेणे करून दुकानदाराला मंजूर केलेले धान्य व त्याने वाटप केलेल्या धान्याचा ताळमेळ लागण्याबरोबरच धान्य नेमके लाभार्थीलाच मिळाले काय, याची पडताळणी करणे सोपे होणार आहे. तालुका तहसीलदारांना धान्य वाटप यादी देतानाच, सदरची यादी रेशन दुकानाच्या कक्षेतील चौकात वा चावडीवरही प्रसिद्ध करण्याची सूचना दुकानदारांना देण्यात आली आहे. म्हणजे धान्य मिळाले किंवा नाही याची खात्री शिधापत्रिकाधारकांनाही करता येणार आहे. याशिवाय शासकीय गुदामातून ज्यावेळी धान्य रेशन दुकानावर येईल त्यावेळी गावातील सरपंच वा प्रतिष्ठित व्यक्तींसमक्ष या धान्याचा पंचनामा केला जावा, कोणते धान्य किती आले याची माहिती त्या पंचनाम्यात नमूद करतानाच, धान्य वाहतूक करणाऱ्या वाहनाचा त्यात विशेष उल्लेख करण्याची सूचनाही नीलेश जाधव यांनी केली आहे. रेशन व्यवस्थेला सुरळीतपणा येण्याबरोबरच त्यातून पारदर्शी व्यवहार होऊन काळाबाजाराला आळा बसण्याची अपेक्षाही जाधव यांनी व्यक्त केली.
धान्य वाटप यादीवरही कार्डधारकाची स्वाक्षरी
By admin | Updated: December 4, 2015 22:46 IST