उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वितरित न करता त्याऐवजी आहाराचे अनुदान थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विविध शासकीय योजना व शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे बँक खाते आहे; परंतु हे प्रमाण फार अत्यल्प असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नवे बँक खाते उघडावे लागत आहे. सुटीतील ३५ दिवसांचे अनुदान पहिली ते पाचवी १५६ रुपये तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता २३४ रुपये ठरणार आहे. कोरोना संकटामुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना अशा परिस्थितीत शासनाने हा निर्णय घेतला असल्याने पालकांच्या सुद्धा चिंता वाढल्या आहेत. त्यामुळे किमान दीडशे रुपयांच्या निधीसाठी एक हजार रुपये ते पाचशे रुपये भरून बँक खाते उघडणे अनेक पालकांना परवडणारे नसून हा निर्णय शासनाने रद्द करावा. नव्याने खाते खोलण्यासाठी लहान मुलांना देखील बँक किंवा सेवा केंद्रात बोलावण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातच रक्कम जमा करण्याचा आग्रह का धरला जात आहे? विद्यार्थ्यांच्याच खात्यावर पैसे जमा करण्याचा आग्रह धरण्याऐवजी पालकांच्या बँक खात्यात पैसे जमा केले पाहिजेत, अशीही मागणी छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेचे प्रदेश अध्यक्ष उमेश शिंदे, युवक प्रदेश अध्यक्ष शिवा तेलंग, शिवाजी मोरे, विजय खर्जूल आदींनी विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
( फोटो ०६ छावा) शालेय पोषणासाठी विद्यार्थी बँक खाते काढण्याचे क्लिष्ट नियम रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना देताना छावाचे उमेश शिंदे, शिवा तेलंग, शिवाजी मोरे, विजय खर्जूल आदी.