पंचवटी : दिगंबर आखाड्याच्या साधू-महंतांचा चतु:संप्रदायाच्या ध्वजावरून अपमान करत असल्यावरून रंगलेला खालसा आखाडा यांच्यातील वादाला पूर्णविराम मिळत नाही तोच आता तीन अनि आखाडा व चतु:संप्रदायाच्या महंतांनी लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत रामसनेहीदास महाराज यांनी आखाडा व खालशाच्या साधू-महंतांना जागा न देता ती व्यावसायिकांना दिल्याच्या कारणावरून रामसनेहीदास यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.चतु:संप्रदायमध्ये आखाडा व ७०० खालशांच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी शाहीपर्वणीचे नियोजन करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत रामसनेहीदास महाराज यांच्याकडे आखाडा तसेच खालशांसाठी जागा मागितली होती मात्र त्यांनी सदरची जागा (लक्ष्मीनारायण मंदिराची) ही साधू-महंतांना न देता ती लल्लू टेंट हाउस तसेच अन्य व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर दिली. याशिवाय दिगंबर तसेच निर्वाणी आखाड्याच्या महंतांविरुद्ध पोलिसांत तक्रार करून साधू-महंतांचा अपमान केला, असा मुद्दा चर्चिला गेल्यानंतर सर्व साधू-महंतांनी एकत्र येऊन रामसनेहीदास यांनी चुकीचे काम केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर आन, पान, खान तसेच व्यवहारावर बहिष्कार टाकण्यात आल्याचा डाकोर खालशाचे महंत माधवाचार्य यांनी घोषित केले.दरम्यान, या बैठकीत शनिवारी होणाऱ्या शाहीस्नानाच्या दिवशी आखाड्यांचा क्रम कसा राहणार आहे यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला महंत ग्यानदास, निर्मोही आखाड्याचे महंत राजेंद्रदास, महंत भगवानदास, अयोध्यादास, चतु:संप्रदायचे बर्फानीदादा, फुलडोलदास, सीतारामदास, श्रीरामकृष्णदास, बृजमोहनदास, ओमकारदास बाबा, चंद्रभादास, भक्तिचरणदास आदिंसह आखाडा तसेच खालशाचे साधू-महंत बैठकीला उपस्थित होते. कुंभमेळा व्यवस्था, शाही मिरवणूक व एकता टिकून राहावी, या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली. (वार्ताहर)
रामसनेहीदास यांच्यावर बहिष्कार
By admin | Updated: August 28, 2015 22:50 IST