पंचवटी : पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल देऊ नये, असे शासनाचे आदेश असतानाही कुठेही या नियमांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर शासनाच्या या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे. मात्र याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.बाटलीत दिल्या जाणाऱ्या पेट्रोलकडे संबंधित विभाग व पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने पेट्रोल पंपचालकांनीही शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. पेट्रोल पंपावर सर्रासपणे बाटलीत खुलेआमपणे पेट्रोल देण्याचे काम सुरू आहे. पेट्रोल ज्वलनशील पदार्थ असल्याने ते बाटलीत देऊ नये, असे आदेश असल्याने पेट्रोल पंपचालकींनी बाटलीत पेट्रोल मिळणार नाही, असे फलक लावले आहेत. मात्र हेच फलक केवळ नावापुरतेच असून, प्रत्यक्षात फलक लावलेल्या पंपावरही सर्रासपणे बाटलीत पेट्रोल देण्याचे काम पंपावर काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाकडून केले जात आहे. बाटलीत पेट्रोल दिल्याने बाटली गरम होऊन फुटण्याची शक्यता असते त्यातच शहरातील मध्यवर्ती भागात बाटलीबंद पेट्रोलमुळे काही घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही शहरातील मध्यवर्ती भागातीलच पंपावर बाटलीत पेट्रोल दिले जात असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे शहरातील जवळपास सर्वच पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल दिले जात असताना प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)
बाटलीत पेट्रोल देण्याचा प्रकार सुरूच
By admin | Updated: August 2, 2016 01:52 IST