सिन्नर : तालुक्यातील माळेगाव येथील सांगळे वस्तीवर शौचालयाची टाकी साफ करताना दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास सदर घटना घडली. टाकीतील घाण साफ करताना त्यात बेशुद्ध होऊन पडलेल्या कामगार युवकाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात घरमालकालाही आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे माळेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. माळेगाव येथे जेनम कंपनीच्या पाठीमागील बाजूस सांगळे वस्ती आहे. एकत्रित शेतकरी कुटुंबातील रामदास मुरलीधर सांगळे (५०) हे माळेगाव औद्योगिक वसाहतीतल्या हिंदुस्तान लिव्हर कंपनीत नोकरीला आहे. शनिवारी कारखान्याला सुट्टी असल्याने त्यांनी आपल्या घराबाहेरील शौचालयाच्या टाकीतील घाण साफ करण्यासाठी काही सफाई कामगारांना बोलावले होते. दुपारी दोनच्या सुमारास टाकीतील काही घाण काढल्यानंतर विकास संजय लोणारे (२०) हा टाकीत उतरल्याचे समजते. टाकीतील विषारी वायूमुळे तो बेशुद्ध होऊन त्यात पडल्याचे सांगण्यात येते. यावेळी आरडाओरडा झाल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी घरमालक रामदास सांगळे मदतीला धावून गेले. सांगळे हेदेखील टाकीत बेशुध्द होऊन पडले. त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडून आरडाओरडा झाला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी व नागरिकांनी सांगळे व लोणारे यांना टाकीतून बाहेर काढून रुग्णालयात नेले. तथापि, तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. सदर घटनेमुळे कुटुंबातील अन्य दोघे सदस्य भोवळ येऊन पडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेल्याची माहिती पोलिसांनी दिली. नगरपालिका रुग्णालयात डॉ. संदीप कचेरिया यांनी शवविच्छेदन केले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक पुंडलीक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मोतीराम वसावे, राम भवर, लक्ष्मण बदादे अधिक तपास करीत आहे. (वार्ताहर)‘निष्ठाहीन कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीने पदे देऊ नये’सिन्नर : पक्षासोबत निष्ठा न ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने पदांची खिरापत वाटू नये, अशी मागणी खंडेराव सांगळे यांनी केली आहे. गेल्या महिन्यात राज्यात रास्ता रोको आंदोलन केले होते. काही ठिकाणी आंदोलनाऐवजी केवळ निवेदन देण्याची वेळ आली. राष्ट्रवादीची सत्ता असताना अनेकांनी पक्षाचा फायदा घेतला. सत्ता गेल्यानंतर काही कार्यकर्ते अन्य पक्षांच्या दावणीला बांधले गेले आहेत. अशा कार्यकर्त्यांना पदे देऊ नये अशी मागणीही यांनी केली आहे.
''शौचालयाच्या टाकीत मिथेन व कार्बन मोनाक्साइड या विषारी वायूचे प्रमाण जास्त असते. आॅक्सिजन कमी प्रमाणात मिळाल्याने दोघे बेशुद्ध होऊन त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, याबाबतचा विसेरा राखून ठेवण्यात आला आहे. त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल. '' - डॉ. संदीप कचेरियावैद्यकीय अधिकारी, सिन्नर नगरपालिका