सिडको : शालेय मुलांमध्ये वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रत्यय पुन्हा एकदा सिडको परिसरातील कामटवाडे शिवारात आला. एका वर्गात शिकत असलेल्या मुलाने आपल्या अन्य मित्रांच्या मदतीने नववीच्या विद्यार्थिनीची छेड काढून तोंड दाबत मानेवर व शरीराच्या अन्य भागांवर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कामटवाडे शिवारातील वृंदावननगरमधील रहिवासी असलेली शाळकरी मुलगी किराणा दुकानात जाण्यासाठी घराबाहेर पडली. यावेळी एका अल्पवयीन मुलाने तिचा पाठलाग करून हात धरला. ‘तू माझ्यावर प्रेम कर’ असे सांगून तोंड दाबत ब्लेडने वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयितांपैकी कोणीतरी तिच्या हातात एक चिठ्ठी दिली. पोलिसांनी ती चिठ्ठी प्राप्त करून त्यावरील मजकूर आणि हस्ताक्षराबाबतही पडताळणी केली. दरम्यान, पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक खांडवी यांनी तपास सुरू केला. दरम्यान, घटनेच्या दिवशी संशयित अल्पवयीन मुलांपैकी एक उत्तर प्रदेशमध्ये तर दुसरा आजारी असल्याने रुग्णालयात उपचार घेत आहे तर तिसरा त्या दिवशी व्यवसाय करीत होता, असे पोलिसांनी सांगितले. फिर्यादी मुलीचा जबाब आणि तपासामधून पुढे आलेले तथ्य व पोलिसांनी नोंदविलेले बारकावे विसंगत असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. पीडित मुलीचा जबाब आणि तपासाअंती मिळालेली माहिती व पुराव्यांमध्ये तफावत असून, तीन वर्षांपूर्वी पीडित मुलगी आणि संशयित अल्पवयीन मुले एकाच शाळेत शिकत होते, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पीडित मुलीने दिलेला जबाब पडताळणीसाठी पोलिसांकडून मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. पीडित मुलीने स्वत:हून ब्लेडने वार करून घेण्याची शक्यताही पोलिसांकडून वर्तविली जात आहे.दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्नपीडित मुलीने दिलेला जबाब आणि तपासातून हाती लागलेली माहिती यामध्ये तफावत आढळली आहे. या मुलीने यापूर्वी दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मुलीची मानसिकता आणि तिने असा जबाब का दिला हे तपासण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊन तिचे समुपदेशन केले जाणार आहे. तपासातील तथ्य व फिर्यादीच्या जबाबामध्ये तफावत दिसत असून तिच्याकडून मिळालेल्या चिठ्ठीमधील मजकुराचे हस्ताक्षरही भिन्न आहे. संशयित मुले अल्पवयीन असून, त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे.- सोमनाथ तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कामटवाडे शिवारात शाळकरी मुलीवर ब्लेडने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:44 AM