नाशिक : खोलवर रुजलेली गुन्हेगारीची पाळेमुळे उखडण्यासाठी पोलीस रिंगणात उतरले आहे. गुन्हेगार पोसणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून, संशयितांची चौकशी व झाडाझडती घेतली जात आहे. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी गुरुवारी रात्री भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल यास मोक्का कायद्यान्वये पोलिसांनी गुरुवारी (दि.२८) संध्याकाळी अटक केली आहे.काही दिवसांपूर्वी हनुमानवाडी कॉर्नरवर झालेल्या खुनाच्या घटनेमधील महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली (मोक्का) अटक केलेल्या संशयित आरोपींना वेळोवेळी सर्व प्रकारची मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी बागुल यास सलग पाच तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. श्रमिक वाहतूक सेना, कामगार सेना, हॉकर्स सेना यांसारख्या विविध संघटनांचे जिल्हाध्यक्षपद भुषविणाऱ्या संशयित बागुलच्या मुसक्या पोलिसांनी अखेर आवळल्या. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सहायक आयुक्त विजयकुमार चव्हाण यांनी बागुलला चौकशीसाठी पोलीस ठाण्यामध्ये बोलाविले. सलग पाच तास त्याची चौकशी करण्यात आली; मात्र चौकशीदरम्यान बागुलने समाधानकारक अशी विश्वसनीय माहिती दिली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला व गुन्हेगारांना वेळोवेळी राजकीय पाठबळ देणे, आर्थिक मदत करणे, आश्रय देणे आणि गुन्ह्णांसाठी प्रवृत्त केल्याच्या संशयावरून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली बागुल यास अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे बागुल याची किमान सहा महिने सुटका होणे अशक्य असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.शहरातील वाढती गुन्हेगारीला पाठबळ देणारे राजकीय, व्यावसायिक क्षेत्रातील वरदहस्त मोडून काढण्याचे आदेश पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी दिले आहे. त्यानुसार आठवडाभरापासून शहर व परिसरातील विविध भागांमध्ये गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून गुन्हेगारीचा बिमोड होईपर्यंत सर्व संशयितांची धरपकड सुरूच राहणार आहे.
भाजपा प्रदेश उपाध्यक्षाच्या पुतण्याला मोक्काखाली अटक
By admin | Updated: July 29, 2016 01:37 IST