नाशिक : नाशिकला दत्तक घेणाऱ्या भाजपाला नाशिककरांनी मतांचे गिफ्ट दिल्यानंतर काही तासांतच भाजपाने यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेली शहर विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध करत ‘रिटर्न गिफ्ट’ दिले आहे. व्हायरल झालेल्या नियमावलीत आणि मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमावलीत एका शब्दाचाही फरक नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असून, मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत दिलेले आश्वासनही फसवे ठरल्याची टीका शिवसेनेने केली आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचार काळात सोशल मिडीयावर बहुचर्चित व बहुप्रतीक्षित शहर विकास नियंत्रण नियमावली व्हायरल झाली होती. मात्र, भाजपा शहराध्यक्ष, पालकमंत्री यांच्यापासून ते मुख्यमंत्र्यांनीही सदर नियमावली ही कपोलकल्पित व खोटी असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तब्बल २०६ पानांची ही नियमावली खोटी कशी असू शकते, असे प्रश्न यावेळी उपस्थित झाले. पालकमंत्र्यांनीही सदर नियमावलीबाबत चौकशीचे आदेश दिले होते. मनसेचे राज ठाकरे यांनी जाहीर सभेत सदर नियमावलीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाशिकला जाहीर सभेत सदर नियमावली ही कपोलकल्पित असल्याचे सांगत नियमावलीत टीडीआर व कपाटाचा मुद्दा व्यवस्थितपणे सोडविला जाईल, असे आश्वासन दिले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर असली नियमावलीची नाशिककरांना प्रतीक्षा लागून होती. निवडणुकीच्या धामधुमीनंतर ती प्रसिद्ध होईल असेही भाजपाकडून सांगितले जात होते. मात्र, निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्याच दिवशी मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावर सदर नियमावली सही-शिक्क्यासह प्रसिद्ध करण्यात आली. व्हायरल झालेली नियमावली व संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या नियमावलीत एका शब्दाचाही बदल नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भाजपाने नाशिककरांना रिटर्न गिफ्ट पाठवून भविष्यातील आपल्या कारभाराची झलक दाखविण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेने तर याबाबत भाजपाला आरोपीच्या पिंजऱ्यात ओढण्याची संधी सोडलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी भावनिक आवाहन करत नाशिककरांची घोर फसवणूकच केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
भाजपाचे रिटर्न गिफ्ट
By admin | Updated: February 25, 2017 00:40 IST