नाशिक : भाजपाच्या शहराध्यक्ष पदासाठी भाजपातील अनेक जण इच्छुक असले तरी, मूळ भाजपेयी नसलेले अन्य अनेक जण इच्छुक असून, त्यात माजी आमदार वसंत गिते, सुनील बागुल आणि दिनकर पाटील यांच्यासारख्या अनेक आगंतुकांची नावे चर्चेत आहेत.भाजपा सत्तेवर आल्यानंतर अनेक पक्षांचे नगरसेवक, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि पक्ष प्रतिनिधींनी भाजपाची वाट चोखाळली आहे. भाजपाने पक्ष संघटना वाढविण्याची संधी साधून येणाऱ्या सर्वांचेच ‘स्वागत’ केले आहे. त्यामुळे पक्षात नवे आणि जुने असा संघर्ष उभा राहिला. नाशिकमध्ये सभासद नोंदणीसंदर्भात मार्गदर्शनासाठी आलेले प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे हा वाद गेल्यानंतर त्यांनी नवे आणि जुने असा वाद करू नका, असे सांगितल्याने नवागतही जोमाने कामाला लागले आहेत. भाजपाच्या शहराध्यक्ष- जिल्हाध्यक्ष पदाची निवडणूक येत्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होणार असून, यावेळी पक्षातील अनेक इच्छुकांबरोबरच पक्षात आलेल्या नव्या आणि सक्षम नेत्यांची दावेदारीही प्रबळ असणार आहे. माजी आमदार वसंत गिते आणि सुनील बागुल यांचीही नावे यानिमित्ताने चर्चेत आली आहेत. गिते यांनी शिवसेनेपाठोपाठ मनसेतही संघटना सांभाळण्याचे काम केले आहे. तर सुनील बागुल यांनी शिवसेनेत जिल्हाप्रमुख म्हणून काम केले आहे. त्यामुळे भाजपाचे संघटन शहर आणि शहराबाहेर वाढविण्यासाठी या साऱ्यांची मदत घेण्याची श्रेष्ठींची तयारी आहे. जनता दल, कॉँग्रेस, बहुजन समाज पार्टी मार्गे भाजपात दाखल झालेले दिनकर पाटीलदेखील इच्छुक असल्याचे वृत्त आहे. (प्रतिनिधी)
भाजपा शहराध्यक्षपद; गिते, बागुल चर्चेत
By admin | Updated: October 4, 2015 22:47 IST