कॉँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे कार्यालयांत शुकशुकाटनाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला शहरातील भाजपा-शिवसेनेच्या कार्यालयांत कार्यकर्त्यांची उद्याच्या जल्लोषाच्या तयारीसाठीची लगबग दिसून आली तर कॉँग्रेस, मनसेच्या कार्यालयांत शुकशुकाट अन् राष्ट्रवादी कार्यालयात तुरळक कार्यकर्ते दिसून आले. लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या असून, त्यापार्श्वभूमीवर शहरातील राजकीय पक्ष कार्यालयांच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. आघाडीचे उमेदवार व पालकमंत्री छगन भुजबळ, महायुतीचे हेमंत गोडसे, तर मनसेचे डॉ. प्रदीप पवार यांच्यात अखेरपर्यंत चुरशीची लढत झाली. त्यामुळे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये निकालाबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. निवडणुकीच्या निकालाला सकाळपासून प्रारंभ होणार असल्याने त्यादृष्टीने राजकीय पक्षांच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. देशभर नरेंद्र मोदी यांची लाट असल्याने त्याचा प्रभाव नाशिक-दिंडोरी लोकसभा मतदारसंघांवरही दिसून आल्याचा दावा शहर भाजपाने केला आहे. एन.डी. पटेल रोडवरील भाजपाच्या कार्यालयात निकालाच्या निमित्ताने जल्लोषाची जय्यत तयारी करण्यात आली असून, सकाळपासून कार्यालयाच्या मुख्य सभागृहात भव्य प्रोजेक्टरवरून निकालासंदर्भातील वृत्तवाहिन्यांचे थेट प्रक्षेपण दाखविले जाणार आहे. पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी बैठक व्यवस्था केली जाणार असून, दुपारनंतर मिरवणुकीसंदर्भात उपनगरीय कार्यालयांनाही तयारीची निर्देश दिल्याचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी सांगितले. शालिमार चौकातील शिवसेनेच्या कार्यालयातही उद्याच्या निकालासंदर्भात जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे. आतषबाजी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फटाके आणण्यात आले असून, गुलालाच्या गोण्याही खरेदी करण्यात आल्या आहेत. महायुतीचे उमेदवार गोडसे विजयी झाल्यास खास शिवसेना स्टाईलमध्ये शहरातून मिरवणूक काढण्याचे नियोजन शहर शिवसेनेतर्फे केले आहे. कॉँग्रेस, मनसे कार्यालयांत शुकशुकाटमहात्मा गांधी रोडवरील शहर कॉँग्रेस समितीच्या कार्यालयास कुलूप होते, तर आवारात कोणीही नव्हते. ठक्कर बजार येथील मनसेच्या कार्यालयाबाहेरही शुकशुकाट दिसून आला. एखाद-दोन कार्यकर्तेच यावेळी उपस्थित होते. मंुबई नाक्यावरील राष्ट्रवादीच्या कार्यालयातही तुरळक कार्यकर्ते दिसून आले. कार्यालयांबाहेर पोलीस बंदोबस्तशहरातील राजकीय पक्ष कार्यालयांबाहेर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कॉँग्रेस समितीचे कार्यालय बंद झालेले असताना बाहेर मात्र पोलिसांचा बंदोबस्त होता. शिवसेना, भाजपा, मनसे, राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरही पोलीस बंदोबस्ताला होते.
भाजपा, सेना कार्यालयांत तयारी जल्लोषाची
By admin | Updated: May 16, 2014 00:26 IST