सिन्नर: तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसह गावांची पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षात घेऊन आमदार माणिकराव कोकाटे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांना कडवा कालव्याला आवर्तन सोडण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सोमवारी सायंकाळी कालव्याद्वारे शंभर क्युसेक वेगाने आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे लाभक्षेत्रातील गावे व शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कडवा पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण काहीसे वाढल्याने कडवा धरण ७ सप्टेंबरला ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे कडवा कालव्यातून पाणी सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. तथापि, पावसाचा जोर वाढत नसल्याने कालव्याद्वारे आवर्तन सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाचे अधिकारी साशंक होते. शेतकऱ्यांसह ग्रामस्थांकडून मात्र लोकप्रतिनिधींना कालव्याद्वारे पाणी सोडण्यासाठी साकडे घातले जात होते. कोकाटे यांनी मध्यंतरी जलसंपदा विभागाला सिन्नर तालुक्यात पुरेसा पाऊस नसल्याने पिके करपण्याची भीती निर्माण झाली असल्याचे तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई निदर्शनास आणून देत कालव्याला पाणी सोडण्याबाबत सकारात्मक विचार करण्याची मागणी केली होती. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी आवर्तन काळात एखाद्या गावाची पिण्याची पाणीटंचाई लक्षात घेऊन आकस्मिक आरक्षण प्राप्त करुन दिल्यास त्याची पूर्तता केली जाईल, अशी माहिती उपअभियंता मिलिंद बागुल यांनी दिली. सोमवारी कालव्यास १०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने ३५० क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता मिलिंद बागुल यांनी दिली. पावसाचा जोर कायम राहिल्यास आवश्यकतेनुसार ओव्हरफ्लोचे पाणी कालव्यातून सुरु ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
---------------------------
नद्या, नाले अद्याप कोरडेठाक
या कालव्यावर इगतपुरी, नाशिक, निफाड व सिन्नर तालुक्यातील ८ हजार ८११ हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. त्यापैकी सिन्नर तालुक्यात ४४९७ हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेला दमदार पाऊस वगळता तालुक्यात जेमतेम पाऊस झालेला आहे. नद्या, नाले अद्याप कोरडेठाक असून धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. तथापि, कालव्याद्वारे आवर्तन सोडण्यात आल्याने लाभक्षेत्रातील पंचाळे व १४ गावे, खडांगळी, कीर्तांगळी, कोमलवाडी, पांगरी, हिवरगाव, पिंपळगाव, रामपूर आदी गावांच्या पाणीपुरवठा योजनांना संजीवनी मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.