नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावर नेहरूनगर उत्सव हॉटेलसमोर रस्त्यात असलेल्या झाडावर अॅक्टिव्हा गाडी जाऊन आदळल्याने गंभीर जखमी झालेल्या गोविंदनगर येथील युवकाचे निधन झाले.मुंबई नाका पाठीमागील गोविंदनगर येथे राहणारा युवक रोहित प्रभाकर टिळक (वय ३२) हा सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास नाशिकरोडकडून द्वारकाच्या दिशेने जात होता. नेहरूनगर उत्सव हॉटेलसमोर रस्त्यात असलेल्या झाडावर रोहितची अॅक्टिव्हा जोरात जाऊन आदळल्याने त्याच्या डोक्याला, छातीला, तोंडावर, उजव्या पायाला दुखापत होऊन तो गंभीर जखमी झाला. जखमी रोहितला तत्काळ खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास त्याचे निधन झाले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मुंबईहून नुकताच नाशिकला आलेला रोहित हा महात्मानगर क्रिकेट क्लबमध्ये क्रिकेट प्रशिक्षक म्हणून बुधवारपासून रुजू होणार होता. (प्रतिनिधी)
झाडावर दुचाकी आदळून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2016 23:54 IST