नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेसने पंधरा वर्षांत केलेल्या भ्रष्ट कारभारामुळे कोणत्याही क्षणी छगन भुजबळ, अजित पवार यांना जेलवारी होऊ शकते, असे संकेत नाशिकचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. अर्थात या दोघांपैकी कोण पहिले वारी करेल याचा क्रम मात्र ठरलेला नाही, असेही ते म्हणाले.सरदार चौकात कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या मीडिया सेंटर येथे महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना हे संकेत दिले. राज्यातील अनेक भागातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने सोमवारी (दि.१४) मराठवाड्यात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते जेलभरोच्या निमित्ताने जेलवारीची सवय करीत असल्याचे सांगितले.गेले पंधरा वर्षे राज्यातील जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग पोखरून काढण्याचे काम राष्ट्रवादीच्या अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे या नेत्यांनी केले. त्याची चौकशी पूर्ण होत असून त्यामुळेच आता भुजबळ किंवा पवार यांची केव्हाही जेलवारी होऊ शकते, असे ते म्हणाले. तर पहिले कोणाची जेलवारी होणार यावर बोलताना त्यांनी प्राधान्यक्रम अद्याप ठरलेला नसल्याचे नमूद केले.
भुजबळ-पवारांची केव्हाही जेलवारी : महाजन
By admin | Updated: September 13, 2015 23:43 IST