भगूर : भगूर नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, सदरची शाळा पालिकेने मराठा विद्या प्रसारक समाजाच्या शाळेला भाड्याने दिलेली आहे. परंतु शाळा मोडकळीस आली असून, कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालिका मुख्य अधिकाऱ्यांना दिले आहे.भगूर नगरपालिकेच्या शाळेचे उद्घाटन २ जून १९७९ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले होते, तर शाळेच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन तत्कालीन खासदार मुरलीधर माने, नगराध्यक्ष मदनलाल लाहोटी यांच्या हस्ते २० मे १९८६ रोजी करण्यात येऊन त्यावेळी शाळेसाठी १८ खोल्या आणि तळमजल्यावर सार्वजनिक कार्यासाठी सभागृह उभारण्यात आले. उद्घाटनानंतर पालिकेने सदरची शाळा जिल्हा परिषदेच्या मराठी जीवन शिक्षण विद्यामंदिर शाळेला इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गासाठी भाड्याने दिली, तर तळमजल्यावरील सभागृह नागरिकांना विविध कार्यक्रमांसाठी भाड्याने दिले जात असल्याने पालिकेला त्यापासून उत्पन्न मिळायला लागले. कालांतराने या इमारतीची डागडुजी कोणी करावी, असा वाद निर्माण झाल्याने जिल्हा परिषदेने शाळेचे स्थलांतर केले. त्यानंतर ही शाळा नाशिक मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या अभिनव बालमंदिर शाळेस १९९८ भाड्याने देण्यात आली. आता या शाळेची दुरवस्था झाली असून, जवळच असलेल्या झोपडपट्टीतील तरुणांनी या इमारतीच्या खिडकीच्या काचा फोडून टाकल्या आहेत. तसेच तळमजल्यावरील सभागृहाचे दरवाजे व खिडक्या काढून नेल्या असून, या ठिकाणी दारूच्या पार्ट्या रंगू लागल्या आहेत. फक्त इमारतीच्या पुढील भागात मैदान असून, काही वर्गखोल्या चांगल्या आहेत. त्यात अभिनव बालविकास मंदिर आणि बालवाडीचे सहा वर्गात २०० मुले शिक्षण घेत आहेत. ही संस्था भगूर नगरपालिकेला ३३ हजार रुपये दरवर्षी भाडे अदा करीत असताना त्यामानाने भगूर पालिका इमारतीला काहीच सुधारणा देत नाही. इमारत धोकेदायक झाली आहे. यासंदर्भात शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालिकेला चार ते पाचवेळा स्मरणपत्रे पाठविली असून, तरीही त्याची दखल घेतली गेली नाही.
भगूरची शाळा मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला!
By श्याम बागुल | Updated: August 24, 2018 15:49 IST
भगूर नगरपालिकेच्या शाळेचे उद्घाटन २ जून १९७९ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले होते, तर शाळेच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन तत्कालीन खासदार मुरलीधर माने, नगराध्यक्ष मदनलाल लाहोटी यांच्या हस्ते २० मे १९८६ रोजी करण्यात येऊन
भगूरची शाळा मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला!
ठळक मुद्देभगूर पालिकेचे दुर्लक्ष : आवारात मद्यपींच्या रंगतात पार्ट्याचार ते पाचवेळा स्मरणपत्रे पाठविली असून, तरीही त्याची दखल नाही.