नाशिक : सुरक्षिततेचे कारण पुढे करीत बंद करण्यात आलेले साधुग्राममधील रस्ते अखेर पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर खुले करण्यात आले. तपोवन, साधुग्राम परिसरातील रस्ते बंद करण्यात आल्याने वाहनधारकांची कोंडी झाली होती. याप्रकरणी पालकमंत्र्यांकडेही तक्रारी झाल्या होत्या. साधुग्राम पाहणी दौऱ्यात पालकमंत्र्यांनी अनावश्यक बॅरिकेड्स हटविण्याबाबत पोलिसांना सूचित केल्याने मंगळवारी सर्व रस्ते रहदारीसाठी खुले झाले.सध्या तपोवनातील कपिला-गोदावरी संगमाकडे जाणारा रस्ता एका बाजूने बंद करण्यात आला आहे. मात्र औरंगाबाद रस्त्याला लागून असलेल्या जनार्दन स्वामी आश्रमाजवळील बॅरिकेडिंग काढण्यात येऊन दोन्ही बाजूने रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले आहेत. तपोवन परिसरासह लक्ष्मीनारायण चौकातील बॅरिकेडिंग काढून रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. त्यामुळे जेलरोडकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत तपोवनाला लागून असलेला औरंगाबाद रस्ता बॅरिकेड्स लावून बंद केल्याने वाहनधारकांना पाच ते सहा किलोमीटरचा फेरा पूर्ण करावा लागत होता. त्यामुळे अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची मोठी अडचण निर्माण झाली होती. लोकांच्या अडचणी लक्षात घेता पोलिसांकडून ही बॅरिकेडिंग काही प्रमाणात शिथिल करण्यात आली होती. परंतु पालकमंत्र्यांनी साधुग्राम पाहणी दौऱ्यात लोकभावनांचा विचार करीत गरज नसेल त्याठिकाणचे बॅरिकेड्स काढून टाकण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिल्याने मंगळवारी भाविक मुक्तपणे फिरताना दिसत होते. साधू-महंतांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रस्ते बंद केल्याने पायपीट करीत आखाड्यामध्ये व कपिला-गोदावरी संगमापर्यंत जावे लागत होते. त्यामुळे भाविकांकडूनही बॅरिकेडिंगला विरोध झाला होता. परराज्यातून येणाऱ्या वाहनधारकांना बॅरिकेडिंग करण्यात आलेल्या ठिकाणाहून रस्ता लक्षात येत नसल्याने त्यांचा गोंधळ होत होता. भाविकांचा व परिसरातील नागरिकांचा वाढता रोष लक्षात घेता रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. (प्रतिनिधी)
बॅरिकेड्स हटले; रस्ते झाले खुले
By admin | Updated: August 12, 2015 00:03 IST