लखमापूर : (बंडू खडांगळे) दिंडोरी तालुक्यातील बळीराजाच्या सुगीच्या दिवसाला ग्रहण लागल्याने, कोणत्याच वस्तूला हमीभाव मिळत नसल्यामुळे संपूर्ण शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. परिणामी बळीराजाच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आहेत.सध्या तालुक्यातील शेतकरीवर्ग अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. रब्बी हंगामात घेतलेली पिके कोरोनामुळे लयास गेली. या हंगामात हाती असलेले भांडवल खर्च करून उत्तम पिके घेतली. परंतु बळीराजाच्या या जिवापाड कष्टाला कोरोना या साथीच्या रोगाची दृष्ट लागली.लाखमोलाची पिके कवडीमोल भावात विकावी लागली. रब्बी हंगाम संपला; पण शेवटपर्यंत कुठल्याही पिकाला हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे डोळ्यातील अश्रू पुसत शेतकरीवर्गाने आपल्याजवळील अल्पभांडवलातून व कर्ज घेऊन खरीप हंगामाची तयारी केली. समाधानकारक पाऊस झाल्याने आशा पल्लवित झाल्या होत्या.महागडे बियाणे खरेदी करून सोयाबीनची पेरणी केली, मात्र काही ठिकाणी सोयाबीनचे बी उतरलेच नाही. तसेच शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याला हमीभाव मिळत नाही. अशा परिस्थितीत भांडवलासाठी घेतलेले विविध बॅँकांचे, सोसायट्यांचे तसेच अन्य मार्गाने घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.-------------------कांदा उत्पादकांना कोरोनाचा फटकाशेती भांडवल नगदी स्वरूपात मिळावे म्हणून तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा व्यापारीवर्गाला न देता स्वत:च्या अथवा भाडेतत्त्वावर कांदा चाळ घेऊन भांडवलासाठी साठवण केली. आता सर्व लक्ष साठविलेल्या कांदा पिकावर केंद्रित करून त्या माध्यमातून तरी आपल्याला रोख स्वरूपात खेळते भांडवल उपलब्ध होईल.या आशेवर बळीराजा तग धरून बसला होता. परंतु कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय बंद पडल्यामुळे कांदा बाजारपेठेत नेल्यानंतर तो कवडीमोल भावाने विकावा लागल्याने शेतकरीवर्गाच्या आशेवर पाणी फिरले आहे.शेतीला जोड धंदा म्हणून शेतकरीवर्गाने दुग्ध व्यवसायात पदार्पण केले. परंतु राज्यात लॉकडाऊनच्या स्थितीत हॉटेल व इतर व्यवसाय बंद पडल्यामुळे दुग्ध व्यवसायही अडचणीत आला आहे. दुधाला हमीभाव मिळावा यासाठी विविध संघटनांनी अभिनव मार्गाने राग व्यक्त केला. शासनाने जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाºया या अन्नदात्याचा अधिक अंत पाहू नये, असे तालुक्यातील मेटाकुटीला आलेल्या शेतकºयांकडून बोलले जात आहे.
सुगीचे दिवस हरपल्याने बळीराजा हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 01:01 IST