नाशिक : रमजान ईदचा सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील विविध प्रमुख चौक, तसेच मुस्लीम बहुल परिसरात आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय-सामाजिक नेत्यांसह कार्यक र्त्यांकडून शुभेच्छा फलक लावण्याची तीव्र स्पर्धा सुरू आहे. मात्र, शुभेच्छा फलकांवर स्वत:च्या छायाचित्राच्या पुढे-मागे कोणत्याही धार्मिक स्थळांच्या छायाचित्रांचा वापर करू नये, अशी मागणी जुन्या नाशकातील युवा मल्टिपर्पज सामाजिक संघटनेने प्रसिद्धिपत्रकान्वये केली आहे.सण-उत्सवांच्या काळामध्ये शुभेच्छा फलकांचे शहरात पेव फुटते. यावेळी राजकीय नेते व कार्यकर्त्यांकडून फलक तयार करताना कुठल्याही प्रकारे दूरदृष्टी व गांभीर्याने विचार केला जात नाही. सर्रासपणे धार्मिक स्थळांच्या छायाचित्रांचा वापर केला जातो. अनेकदा शुभेच्छुकाचा फोटो मोठा व त्याखाली किंंवा टोकालाच एखाद्या धार्मिक स्थळाचे छायाचित्र लहान स्वरूपात छापलेले असते. फलक ऊन, वारा, पावसाने खराब होतो व कालांतराने फाटतो यामुळे धार्मिकस्थळांच्या चित्रांचा अवमान होण्याची शक्यता असते. त्यामुळे शुभेच्छा देताना याबाबत काळजी घेणे गरजेचे असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष असलम खान यांनी पत्रकात म्हटले आहे. शहरात अशाप्रकारचे शुभेच्छा फलक लावल्याचे आढळून आल्यास ते संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून तत्काळ काढून घेतले जातील व संबंधित व्यक्तींकडे जमा केले जातील याची नोंद घ्यावी, असे खान यांनी सांगितले. (प्रतिनिधी)