नाशिक : नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजसेवक सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणुकीची मतदानप्रक्रिया आज रविवारी (दि.५) पार पडली. निवडणुकीच्या रिंगणात ‘सभासद विकास’ आणि ‘समर्थ’ अशा दोन पॅनलमध्ये लढत झाली. या लढतीत समर्थ पॅनलच्या उमेदवारांना सर्वाधिक मते मिळाल्याने ‘सभासद विकास’चा धुव्वा झाला. २०१५-२०१६ ते २०२०-२१ अशा पाच वर्षांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी तीन हजार ३६२ मतदारांपैकी दोन हजार ९६५ मतदारांनी मतदान केले.सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानप्रक्रियेत अभिनव बाल विकास मंदिर या मतदान केंद्रावर एकूण सरासरी ९० टक्के मतदान झाले. कप-बशी निशाणी असलेल्या सभासद विकास पॅनलच्या सर्वसाधारण गटात बारा व पतंग निशाणी असलेल्या समर्थ पॅनलच्या गटात बारा, तीन उमेदवार अपक्ष असे एकूण २७ उमेदवार तसेच महिला राखीव गटात दोन्ही पॅनलचे प्रत्येकी दोन असे एकूण चार विमुक्त जाती भटक्या जमाती गट, अनु. जाती-जमातीगटात दोन्ही पॅनलचे मिळून प्रत्येकी एक असे दोन आणि इतर मागासवर्गीय गटात प्रत्येकी दोन असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यापैकी समर्थ पॅनलचे नानासाहेब दाते यांना सर्वाधिक मतदारांनी कौल दिल्याने त्यांना एकू ण दोन हजार ४२ मते मिळाली व दुसऱ्या क्रमांकावर याच पॅनलचे बाळासाहेब मोगल यांनी एक हजार ६३० मते मिळविली. तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरही ‘समर्थ’च्या उमेदवारांनी वर्चस्व राखले. महिला राखीव गटातही समर्थ पॅनलच्या सुवर्णा कोकाटे यांनी सर्वाधिक एक हजार ५२६ मते मिळवून प्रतिस्पर्धी उमेदवार कीर्ती बच्छाव यांचा ७४ मतांनी पराभव केला. विमुक्त जाती, अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग अशा सर्वच गटांत ‘समर्थ’च्या उमेदवारांनी बाजी मारली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरुण ढोमसे यांनी काम पाहिले. रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास निकाल जाहीर होताच मराठा हायस्कूलच्या आवारात ‘समर्थ’च्या उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.
सरासरी ९० टक्के मतदान : मविप्रच्या जिल्हा समाजसेवक सहकारी सोसायटीवर वर्चस्व
By admin | Updated: July 6, 2015 00:23 IST