नाशिकरोड : नाशिकरोड पोलीस ठाण्यात साडेनऊ लाख रुपयांच्या शासकीय मुद्देमालाचा अपहार केल्याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक ईश्वर दुबे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. दुबे यांना मंगळवारी न्यायालयासमोर उभे केले असता शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.नाशिकरोड पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक ईश्वर धनालाल दुबे हे आॅगस्ट २००८ पासून मुद्देमाल विभागाचे कारकून म्हणून काम बघत होते. या काळात जुगारात जप्त केलेली रक्कम शासनाकडे जमा करणे, इतर गुन्ह्यांतील मौल्यवान वस्तूंचे जतन करणे आवश्यक होते. मात्र दुबे यांच्या ताब्यात सोपविलेल्या सुमारे ९ लाख ६० हजार रुपयांच्या मुद्देमालाचा त्यांनी अपहार केल्याचा ठपका आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दुबे यांच्याविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)