वाहनधारक त्रस्त : वळविली वाहतूकपंचवटी : अशोकस्तंभ ते मखमलाबाद नाका रस्त्यावर सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास वाहतुकीची कोंडी झाल्याने रामवाडी चौफुलीकडून घारपुरे घाटाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. सकाळची वेळ मुलांना शाळेत सोडण्याची तसेच कामावर जाण्याची असल्याने शेकडो नागरिकांची यामुळे धावपळ झाली. पर्यायी मार्ग म्हणून पोलिसांनी रामवाडीकडून चोपडा लॉन्स रस्त्याने वाहतूक वळविल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला. गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमाराला अशोकस्तंभदरम्यान, वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याने घारपुरे घाट व पुढे मखमलाबाद नाक्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या होत्या, तर घारपुरे घाटाकडून स्तंभाकडे जाणाऱ्या वाहनांना रामवाडी चौफुलीवर असलेल्या वाहतूक पोलिसांनी मनाई करून वाहने सोडली नसल्याने नागरिकांना नियोजित ठिकाणी पोहचण्यासाठी उशीर झाला. घारपुरे घाटाकडची एकेरी वाहतूक का बंद केली याची विचारणा वाहनधारक चौफुलीवर असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडे करत होते; मात्र ते केवळ इकडून जाऊ नका एवढेच सांगत असल्याने नेमकी काही घटना घडली की अपघात झाला, हे नागरिकांना समजत नव्हते. रस्ता बंद असतानाही काही वाहनधारकांनी तेथून जाण्याचा प्रयत्न केल्याने वाहतूक पोलीस व वाहनधारक यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाल्याचे दिसून आले. (वार्ताहर)
अशोकस्तंभ ते मखमलाबाद नाका वाहतुकीची कोंडी
By admin | Updated: July 3, 2015 23:33 IST