नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील देशवंडी येथे गेल्या आठ दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पाणी असूनही महिलांना भटकंती करावी लागते आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली असतानाही जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकार्यांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केली आहे. नायगावसह नऊ गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेतून गावाला पाणीपुरवठा केला जातो. या योजनेचे पाणी प्रथम जायगाव येथील जलकुंभात टाकण्यात येते व तेथून वीजपंपाने हे पाणी उचलून देशवंडी ग्रामपंचायतीने केलेल्या पूरक नळपाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभात सोडले जाते. त्यासाठी जायगाव येथील जलकुंभातून पाणी उचलण्यासाठी असलेल्या वीज पंप गेल्या आठ दिवसांपासून नादुरुस्त झाला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परिणामी पाणी येत नसल्याने ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. महिलांना गावातील हातपंप, परिसरातील विहिरींवर पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन भटकंती करावी लागते आहे. मध्यंतरी जायगाव येथे अवकाळी पाऊस झाला. त्यावेळी जोरदार वादळ झाल्याने तसेच अनेक वृक्ष उन्मळून पडल्याने वीज पुरवठा करणार्या विद्युत वाहिन्यांचे शॉर्टसर्कीट झाले. त्यामुळे सदोष वीजपुरवठ्यामुळे वीजपंप नादुरुस्त झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली. नादुरुस्त झालेला वीजपंप दोन दिवसांत दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी प्रयत्न करीत असल्याची माहिती सरपंच मुरलीधर बर्के यांनी दिली. (वार्ताहर)
देशवंडी येथे कृत्रिम पाणीटंचाई
By admin | Updated: June 2, 2014 01:26 IST