मालेगाव : शहराची साफसफाई व आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या येथील तब्बल ३२३ कोटी ५० लक्ष रुपयांच्या भुयारी गटार योजनेच्या प्रस्तावास आज महानगरपालिका स्थायी समितीच्या बैठकीत अंतिम मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी स्थायी समिती अध्यक्ष इरफान अली होते. हद्दवाढ भागवगळता मूळ मालेगाव शहरासाठी असलेल्या या प्रकल्पाची मूळ रक्कम ही २४६ कोटी १४ लक्ष ४६ हजार ९१० रुपये इतकी होती. त्यासाठी केंद्र शासनाने प्रथम हप्ता म्हणून १०१ कोटी ८७ लक्ष रुपयांचा हप्ता मंजूर केला आहे. त्यानंतर मनपा प्रशासनातर्फे रितसर ई-निविदा काढण्यात आली. त्यात दाखल तीन निविदाधारकांपैकी मे. मालेगाव सेव्हेज मॅनेजमेंट जेव्ही या संस्थेने आधी ३९५ कोटी ५५ लक्ष ४५ हजार १८४ रुपयांची निविदा ही सर्वांत कमी रकमेची होती. मात्र ही निविदादेखील तुलनेने अधिक रकमेची असल्यामुळे कमी रकमेच्या निविदेची विनंती करण्यात आली. त्यानुसार याच संस्थेने ३०४ कोटी २१ लक्ष ६८ हजार २४२ रुपयांची निविदा सादर केली. सदर रक्कम ही मूळ प्राकलन रकमेपेक्षा २३ टक्के अधिक आहे. पुढील पाच वर्षाकरिता देखभाल व दुरुस्ती करून घेण्यासाठी अतिरिक्त १९ कोटी ४१ लक्ष रुपये खर्चासह एकूण ३२३ कोटी ५० लक्ष रुपयांच्या या निविदेस मान्यता देण्यात आली. स्थायी समितीच्या या निर्णयामुळे सदर योजना लवकरच कार्यान्वित होण्याची शक्यता बळावली आहे. यावेळी स्थायीचे सर्व सदस्य व मनपाचे संबंधित सर्व अधिकारी हजर होते.
मालेगावी ३२३ कोटींच्या गटार योजनेस मंजुरी
By admin | Updated: July 31, 2014 00:52 IST